खाद्यतेलाच्या दरवाढीने गृहिणींचे महिन्याचं बजेट कोलमडले…

एकीकडे सणासुदीचे दिवस सुरु असताना गृहिणींना महागाईचा धक्का बसला आहे. केंद्र सरकारने तेलावरील ‘एक्साईज ड्युटी’ वाढविल्यामुळे खाद्यतेलाच्या दरात मोठी वाढ झालीय.खाद्यतेलाचे दर तब्बल २० ते २५ रुपयांनी महागले आहे. महिन्यापूर्वी शंभर रुपये किलो दराने मिळणारे सोयाबीन खाद्यतेल आता १२० ते १२५ रुपये किलो दराने मिळत आहे.

वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य कुटुंबीयांना दर महिन्याला खर्चाचे नियोजन करणे अवघड होत आहे. दैनंदिन वापरात खाद्य तेल म्हणून सर्वाधिक सोयाबीन तेलाचा मोठ्‍या प्रमाणावर वापर केला जातो. कुठलीही भाजी किंवा इतर पदार्थ तयार करण्यासाठी सोयाबीन तेल हे गृहिणींसाठी नित्याचेच लागते. या तेलाच्या दरात टप्प्याटप्प्याने होणारी दरवाढ गृहिणींसाठी डोकेदुखी ठरली आहे.

ऐन सणासुदीच्या काळात सोयाबीन तेलावरील साडेबारा टक्के असलेली ‘एक्साईज ड्युटी’ आज साडे बत्तीस टक्के आकारली जात आहे. याचा फटका मात्र सर्वसामान्य ग्राहकांना बसत आहे. तेलाचे भाव वाढत असल्याने गृहिणींचे महिन्याचे नियोजन कोलमोडल्याचे दिसून येत आहे. केंद्रासह राज्य सरकारने सर्वसामान्यांच्या विचार करुन दरवाढीसंदर्भात निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.