“बिग बॉस मराठी विनर…” या स्पर्धकासाठी ‘मुंबईच्या राजा’ चरणी चाहत्याचं साकडं

‘बिग बॉस मराठी’ च्या यंदाच्या पर्वाला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळताना दिसते. अगदी अल्पावधीत हा शो प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनला आहे. या शोप्रमाणे त्यातील स्पर्धकही आपल्या खेळीने चाहत्यांची मनं जिंकत आहेत.त्यासाठी आपल्या आवडत्या स्पर्धकाला जिंकवण्यासाठी नेटकऱ्यांसह ‘बिग बॉस मराठी’चे प्रेक्षक वेगवेगळ्या माध्यमातून त्यांना पाठिंबा देताना दिसत आहेत. अशातच एका ‘बिग बॉस मराठी’च्या चाहत्याने त्याचा आवडता स्पर्धक यंदाचं पर्व जिंकावा यासाठी चक्क बाप्पाकडे साकडं घातलं आहे. याचा फोटो सोशल मीडियावर समोर आला आहे. या चाहत्याने ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा स्पर्धक पॅडी कांबळेसाठी गणरायाकडे प्रार्थना केली आहे.

दहा दिवस लाडक्या गणरायाची मनोभावे पूजा केल्यानंतर घरगुती गणपतींसह सार्वजनिक मंडळांच्या गणपतींना आज, मंगळवारी भावपूर्ण निरोप देण्यात येणार आहे. दरम्यान, बाप्पाला निरोप देताना एका चाहत्याने ‘मुंबईच्या राजा’ चरणी एक चिठ्ठी लिहून त्यामध्ये ‘पॅडी’ कांबळेसाठी प्रार्थना केल्याचं दिसतंय. या चिठ्ठीमध्ये पॅडीच्या चाहत्याने लिहलंय, “Bigg Boss Marathi Season 5 Winner आपला पॅडी दादा”. पॅडने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर ही पोस्ट शेअर केली आहे