विसर्जन मिरवणुकीसाठी सांगली, मिरज सज्ज!

मंगळवारी होत असलेल्या मिरजेतील गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी कार्यकर्त्यांची लगबग सुरू असून विजर्सन मिरवणुकीच्या मार्गावर दहा स्वागत कमानी उभारल्या आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण विसर्जन मिरवणूक मार्ग कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा फलकांनी झाकोळला गेला आहे.विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडावी यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना शिंदे-गट, शिवसेना उबाठा-गट, विश्वशांती मंडळ आदींसह दहा कमानी विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर उभारण्यात आल्या आहेत. याशिवाय महापालिका, जनसुराज्य शक्ती यांनी स्वागत कक्षही उभारले आहेत.

विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडावी यासाठी स्वत: पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर अधीक्षक रितू खोचर यांच्यासह चार उपअधीक्षक, १४ पोलीस निरीक्षक, ७१ पोलीस उपनिरीक्षक, ५४५ पोलीस अंमलदार, गृहरक्षक दलाचे ११३ जवान, फिरती पथके ८ तैनात करण्यात आली असल्याची माहिती उपअधीक्षक प्रणिल गिल्डा यांनी सोमवारी दिली. महापालिकेनेही गणेश तलाव या ठिकाणी विसर्जनासाठी तयारी केली असून या ठिकाणी भोई समाजाचे तरुण मदतीसाठी तैनात करण्यात आले आहेत. मूर्तिदानाची व्यवस्थाही करण्यात आली असून शहरात अन्य आठ ठिकाणी कृत्रिम तलावामध्ये विसर्जन व्यवस्था करण्यात आली आहे. एकाच वेळी किमान दोन ठिकाणी विसर्जन करता येईल, अशी व्यवस्था गणेश तलावाच्या ठिकाणी करण्यात आली आहे.