गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत चोरट्यांचा सुळसुळाट! दोनशेहून अधिक मोबाईल, दागिन्यांवर डल्ला

मिरवणुकीत झालेल्या गर्दीचा फायदा घेत दागिने, पाकिटे, मोबाईलवर चोरट्यांकडून हात साफ करण्यात आला. मिरवणूक मार्गावर २१२ हून अधिक मोबाईल गेल्याच्या तक्रारी पोलिस ठाण्याकडे प्राप्त झाल्या.

तर दोन सोनसाखळी चोरी, पाकिटाच्या चोरीचे गुन्हे दाखल करण्याचे काम जुना राजवाडा पोलिस ठाण्यात सुरू होते. विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यासह सांगली, निपाणी, कोकणातून भाविक शहरात दाखल झाले होते. मंगळवारी सायंकाळनंतर मिरवणुकीत गर्दी वाढत गेली.

मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, खरी कॉर्नर, ताराबाई रोड, गुजरी कॉर्नर, पापाची तिकटी, महानगरपालिका, गंगावेश, इराणी खण याठिकाणी झालेल्या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी मोबाईल, दागिन्‍यांवर डल्ला मारला. मोबाईल नेमका कोठे गेला याची माहिती तक्रारदारांना सांगता येत नव्हती. मिरवणूक मार्गावरील बहुतांश भाग जुना राजवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत तर काही भाग लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत येतो.

यामुळे काही तक्रारदारांना दोन पोलिस ठाण्याची वारी करावी लागली. मोबाईलचे बिल, तक्रार अर्ज घेऊन पोलिस ठाण्यात आलेल्यांची रीघ लागली होती. जुना राजवाडा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यासाठी दोन स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती.