गणपती विसर्जनावेळी ट्रॅक्टर ट्राॅलीतून पडून तरुणाचा मृत्यू

गणपती विसर्जन मिरवणुकीनंतर रात्री घरी जात असताना धावत्या ट्रॅक्टर ट्रॉलीतून तोल जाऊन पडल्याने तरुणाचा मृत्यू झाला. सूरज हिंमत शेवाळे (वय २७, रा. माणकापूर, ता.निपाणी) असे त्याचे नाव आहे. इचलकरंजी-माणकापूर मार्गावर अनंत चतुर्दशीला रात्री ट्रॉलीतून मित्रांसमवेत घरी जाताना अपघात झाला.

त्याला येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच मृत्यू झाला.ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात नागरिक विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी शहरात येतात.

रात्री बारा वाजता मिरवणुका थांबल्या की नागरिक परतीच्या मार्गावर लागतात. मंगळवारी (ता. १७) सायंकाळी माणकापूर येथील काही तरुण दुचाकीवरून तर काही पायी चालत शहरात आले होते. पंचगंगा नदी घाटावर विसर्जन करून एक मोकळा ट्रॅक्टर ट्रॉलीसह रांगोळी मार्गावर निघाली होता. मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास त्या ट्रॉलीत चालत जाणारे काही तरुण बसले. गणरायाच्या निरोपाचा जयघोष करत सर्व तरुण मंडळी फाळकी सोडलेल्या भरधाव ट्रॉलीतून जात होते.

दरम्यान, तेरदाळे मळा भागात वळसा घालत असताना अचानक ट्रॉलीला हादरा बसला. यामध्ये सूरजचा तोल गेला आणि तो थेट रस्त्यावर कोसळला. त्याच्या तोंडाला आणि डोक्याला गंभीर मार लागला. मागून येणारे दुचाकीवरील नागरिक आणि ट्रॉलीतील तरुणांनी त्याला येथील खासगी रुग्णालयात नेले; मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

आयजीएम रुग्णालयात विच्छेदन करून मृतदेह आज सकाळी नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेने गावात शोककळा पसरली आहे. त्याच्या मागे आई-वडील, पत्नी, भाऊ, लहान मुलगी असा परिवार आहे.