विधानसभा निवडणूक नोव्हेंबरमध्ये होणार असे मानले जात आहे. मात्र राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पुण्यातील चिंचवड मतदारसंघाच्या विद्यमान भाजप आमदार अश्विनी जगताप या शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीत अश्विनी जगताप या भाजपच्या कमळ चिन्हा ऐवजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तुतारी चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरु आहे.
शहर भाजप पदाधिकाऱ्यांकडून मात्र अश्विनी जगताप यांनाच उमेदवारी मिळणार असल्याचे म्हटले जात आहे.अश्विनी जगताप यांना पुन्हा उमेदवारी न देता भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांना उमेदवारी देण्याच्या तयारीत भाजप असल्याची चर्चा आहे.
याची माहिती आमदार अश्विनी जगताप यांना मिळाली, त्यामुळेच त्यांना आता शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक लढण्याची तयारी केली असल्याचे बोलले जात आहे. अश्विनी जगताप यासंबंधी ऑन कॅमेरा बोलण्यास तयार नाहीत. मात्र शंकर जगताप यांच्यासोबत असलेले त्यांचे मतभेद लपून राहिलेले नाहीत.