सांगोला विधानसभा मतदारसंघात होऊ शकते तिरंगी, चौरंगी लढत….

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला प्रत्येक पक्षातून जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. गतवेळी अवघ्या 768 मतांनी जिंकलेल्या बापूंना मतदारसंघात यंदाही ‘लाल वादळा’चे आव्हान असणार आहे. लोकसभेला सांगोला मतदारसंघ माढा मतदारसंघात येतो. यंदा इथून भाजपचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांना चार हजार 482 मतांचे मताधिक्य मिळाले.

पण आमदार शहाजीबापू पाटील आणि दीपकआबा साळुंखे असे दोन नेते असताना निंबाळकर यांना म्हणावे तसे मताधिक्य मिळू शकलेले नाही. शहाजीबापूंसमोर दुसरे आव्हान आहे ते महायुतीचेच.

यंदा हा मतदारसंघ अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस मागत आहे. येथून जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे यांनी जोरदार तयारी सुरू केलीय. त्यांना अजित पवारांचा फुल सपोर्ट आहे. महायुतीत घटक पक्ष जागा मागत असल्याने शहाजीबापूंसमोर तिकीटासाठी अडचणी वाढू लागल्या आहेत.

एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्याने त्यांच्यावर होत असलेली टीका, लोकसभा निवडणुकीवेळी विजयसिंह मोहिते पाटील यांच्याशी घेतलेला पंगा याही गोष्टी शहाजीबापू पाटील यांच्यासाठी अडचणीच्या ठरू शकतात.दुसरीकडे शेकाप महाविकास आघाडीत आहे. शेकापकडून डॉ. अनिकेत देशमुख आणि त्यांचे बंधू बाबासाहेब देशमुख हे दोघे तयारी करत आहे.

मागील निवडणुकीच्या पराभवानंतर अनिकेत देशमुख हे वैद्यकीय शिक्षणासाठी परदेशी गेले होते. त्यामुळे त्यांचा मतदारसंघात जनसंपर्क तुटला होता. तर बाबासाहेब देशमुख यांनी बाजार समिती, खरेदी विक्री संघ बिनविरोध करत ते अॅक्टिव्ह राहिले आहेत. परंतु या दोघांमध्ये उमेदवारी कुणाला? याची डोकेदुखी मात्र शेकापसमोर राहणार आहे.

लोकसभेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे धैर्यशील मोहिते यांना दोन्ही देशमुख भावांनी मदत केली होती. पण शेकापच्या जयंत पाटील यांचा पाठिंबा बाबासाहेब यांना असू शकतो. त्याचवेळी विधानपरिषद निवडणुकीत ठाकरे गटाने शेकापचे नेते जयंत पाटील यांनी मदत केली नाही.

ठाकरे गटाने मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी देत निवडूनही आणले. त्यामुळे शेकापचा करेक्ट कार्यक्रम ठाकरेंनी केलाच. पण आता हा मतदारसंघ शिवसेनेकडून मागितला जात आहे.

याशिवाय ही जागा शेकापला गेल्यास शिवसेनेची मदत घ्यावी लागणार आहे. तर शिवसेनेला गेल्यास शेकापची मदत लागणार आहे. त्यामुळे ही जागा कोणाला जाते हा प्रश्न महाविकास आघाडीमध्ये तयार झालाय. दोन्ही आघाड्यांची तयारी पाहता येथे तिरंगी, चौरंगी लढत होऊ शकते.