पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षांतील गैरप्रकारांना (कॉपी) आळा घालण्यासाठी शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने भरारी पथकांची संख्या वाढविली. त्याची अंमलबजावणी हिवाळी सत्रातील परीक्षांमध्ये केली.
त्यामुळे आतापर्यंत झालेल्या १८० परीक्षांमध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात एकूण ६७८ विद्यार्थी कॉपी करताना सापडले आहेत. ऑक्टोबर- नोव्हेंबर या हिवाळी सत्रातील विद्यापीठाच्या परीक्षा २० ऑक्टोबरपासून सुरू झाल्या. या सत्रात एकूण ७८० परीक्षा होणार आहेत.
त्यात पदवी प्रथम, द्वितीय वर्षाच्या परीक्षा महाविद्यालयांकडून, तर तृतीय वर्षाच्या परीक्षा विद्यापीठाकडून घेतल्या जात आहेत. कला, वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी आदी विद्याशाखांतील पदविका, पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षांमध्ये कॉपी करण्याचे प्रमाण वाढत असल्याचे परीक्षा मंडळाला दिसून आले.
त्यावर या मंडळाने कॉपी करणाऱ्यांना पकडण्यासाठी कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांसाठी असलेल्या प्रत्येकी एक भरारी पथकांची संख्या तीन इतकी केली. पूर्वी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील १६ परीक्षा केंद्रांवर बैठे पथक तैनात करण्यात येत होते. त्यांची संख्या २७ इतकी केली. या पथकांच्या धडक कारवाईने आतापर्यंत ६७८ जण कॉपी करणारे सापडले आहेत. त्यांच्यावर परीक्षा प्रमाद समितीकडून कारवाई होणार आहे.