सांगली रोझ सोसायटी आणि मराठा समाज यांच्या संयुक्त विद्यमाने ४६ वे गुलाब पुष्प प्रदर्शन आणि पुष्परचना स्पर्धा उद्या शनिवारपासून (दि. २१) दोन दिवस मराठा समाज संस्थेच्या सभागृहात घेण्यात येत आहे, अशी माहिती मराठा समाजचे अध्यक्ष अभिजीत पाटील, पुष्परचना विभाग प्रमुख श्रेया भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रदर्शनाचे उद्घाटन शनिवारी, दि. २१ रोजी सकाळी अकरा वाजता खासदार विशाल पाटील, पूजा पाटील यांच्या हस्ते होणार आहे.
बक्षीस वितरण रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता डॉ. दिलीप पटवर्धन, डॉ. माधवी पटवर्धन यांच्या हस्ते आहे. प्रदर्शनात गुलाब, जरबेरा, कार्नेशियन फुलांचे प्रदर्शन, पुष्परचना स्पर्धा, फुलांची रांगोळी आणि त्याचे विविध प्रकार असतील. फूल विक्रेत्यांसाठीही स्पर्धा होणार आहेत.
हॅपी फ्लॉवर्स ही थीमही असेल. लोकांनी सर्वत्र सजावटीसाठी आणि कार्यक्रमांसाठी नैसर्गिक फुलांचाच वापर वाढवावा, असा संदेशही या निमित्ताने दिला जातोय. मतिमंद, मूकबधिर मुला-मुलींसाठी स्वतंत्र विभाग असून त्यांच्या स्पर्धाही स्वतंत्र होतील.
विजेत्यांना आकर्षक बक्षिसे, ट्रॉफी मिळेल, असे रोझ सोसायटीचे अध्यक्ष तानाजी चव्हाण, ए. डी. पाटील यांनी सांगितले.