पट्टणकोडोलीत श्री विठ्ठल-बिरदेव यात्रेस २१ ऑक्टोबरपासून होणार सुरुवात


कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश यासह अन्य राज्यांचे लाखो च भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र हातकणंगले तालुक्यातील येथील श्री विठ्ठल- बिरदेव यात्रेला सोमवार २१ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे.

याचदिवशी फरांडेबाबांची भाकणूकही होणार आहे. ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या बैठकीत समस्त पुजारी, धनगर समाज, हेगडे, बोते, मानकरी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आला.

कर्नाटकातील संकेश्वर, बुदनूर, अथणी, रायबाग येथील शेकडो हेगडे बांधव पायी पट्टणकोडोली येथील श्री विठ्ठल-बिरदेव यात्रेचा कार्यक्रम ठरविण्यासाठी दरवर्षी येतात.

यात्रेचा कार्यक्रम सोमवार ता. २१ ऑक्टोंबरला यात्रेला प्रारंभ, हेगडे, बोते यांचा नैवेद्य, दुपारी भाकणूक, श्रींची पहिली व दुसरी पालखी, मंगळवार ता. २२ रोजी भरयात्रा, सार्वजनिक नैवेद्य, श्रींची तिसरी व चौथी पालखी, बुधवार ता. २३ रोजी फुटयात्रा व श्रींची पाचवी अखेरची पालखी होणार आहे.

यावर्षी परंपरेनुसार हेगडे बांधवांनी आणलेल्या मानाच्या दुधाच्या घागरी येथील मंदिरात अर्पण केल्या. यावेळी घागरीतील दूध उतू घालविण्याचा पारंपारिक कार्यक्रमही झाला. विठ्ठल-बिरदेव मंदिरात दर्शन घेऊन येथील ग्रामपंचायत कार्यालयात यात्रा कार्यक्रम ठरविण्यासाठी हेगडे बांधव जमले. मानकरी नंदकुमार जोशी यांनी यात्रेचा सविस्तर कार्यक्रम जाहीर केला.