लाडकी बहीण योजनेचे या पठ्याने बायकोचे वेगवेगळ्या नावाने भरले २८ अर्ज..

राज्यात लाडकी बहीण योजनेची चर्चा सर्वाधिक सुरु आहे. या योजनेचे पैसे मिळवण्यासाठी काय, काय प्रकार होताय? त्याचे किस्सेही अधूनमधून समोर येत आहेत. त्यासंदर्भातील किस्सा अजित पवार यांनी भाषणात सांगितला. एका व्यक्तीने त्यांच्या पत्नीच्या नावाने २८ अर्ज भरले, असे अजित पवार यांनी सांगितले. ते म्हणाले, माझ्या सातारा जिल्ह्यात एक पठ्या निघाला. त्याने आपल्या बायकोच्या नावाने २८ अर्ज भरले. प्रत्येक अर्जावर वेगवेगळे फोटो लावले. त्याचा हा प्रकार लक्षात आला. मग आता चक्की पिसींग पिसींग पिसींग… आता आम्ही या योजनेची मुदत वाढवली आहे. आता या योजनेसाठी ३० सप्टेंबरपर्यंत अर्ज भरता येणार आहे.

राज्यात सर्वाधिक अर्थसंकल्प मांडण्याचे श्रेय शेषराव वानखेडे यांच्या नावावर आहे. त्यानंतर माझा नंबर लागतो. मी आत्तापर्यंत १० अर्थसंकल्प मांडले आहेत. पण मी अर्थसंकल्प मांडताना पहिल्या स्थानावर महिलांना ठेवले आहे. कारण महिला खूप कष्ट करतात. त्या आपल्या कुटुंबाचा पहिला विचार करतात. काही लोक दीड हजार रुपयांच्या संदर्भात चेष्ठा करतात. पण जे सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आले आहेत त्यांना दीड हजारांची किंमत काय कळणार? असा टोला अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेचा विरोध करणाऱ्या विरोधकांना लगावला.