मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक दुसऱ्यांदा स्थगित करण्यात आली. येत्या रविवारी 22 सप्टेंबरला होणारी मुंबई विद्यापीठाची निवडणूक पुढील आदेश मिळेपर्यंत स्थगित करण्यात येत आहे, असे परिपत्रक मुंबई विद्यापीठाकडून जारी करण्यात आले. आता यावरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. त्यातच आता शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला. महाराष्ट्राने एवढे घाबरट, गद्दार मुख्यमंत्री याआधी कधीही पाहिलेले नाहीत, अशा शब्दात आदित्य ठाकरेंनी हल्लाबोल केला. आदित्य ठाकरे यांची नुकतंच एक पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरेंनी सिनेट निवडणुका लढवणाऱ्या सर्वच उमेदवारांचे कौतुक केले. तसेच त्यांना आज तुमचा विजय झाला आहे, असेही सांगितले. यावेळी आदित्य ठाकरेंनी सिनेट निवडणुका पुढे ढकलण्यावरुन मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुंसह राज्य सरकारवरही टीका केली.
आमच्या सिनेटच्या सर्व उमेदवारांच्या चेहऱ्यावर हसू आहे. एक वेगळाच आनंद आहे. कारण आज आमचा विजय निश्चित झालेला आहे. जेव्हा राज्यात भाजपचे सरकार असतं आणि आता मिंधेंची जी राजवट आहे, आज एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे की एवढे घाबरट, गद्दार मुख्यमंत्री या महाराष्ट्राने कधीही पाहिलेले नव्हते. त्यामुळे डरपोक CM म्हणजे नावापुढे DCM लावायला हवं, हे आता स्पष्ट झालेलं आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
“सरकारच्या मनात प्रचंड भीती बसलेली आहे. विधानसभेच्या आधी कोणतीही निवडणूक घ्यायची नाही, हे त्यांनी ठरवलेलं आहे. त्यामुळे CM च्या आधी आता D लावावं लागेल. ते डरपोक आहेत. निवडणुकांना सामोरे जायचं नाही. गेले कित्येक वर्षे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झालेल्या नाहीत. मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीतही ते हरतील, हे त्यांना माहिती आहे, त्यामुळेच ते निवडणुका घेत नाहीत”, असा आरोपही आदित्य ठाकरेंनी केला.
“२०१० मध्ये आम्ही स्वतंत्र लढलो तेव्हा १० पैकी ८ सीट जिंकलो होतो. त्यानंतर २०१८ मध्ये १० पैकी १० जागा जिंकलो. खरंतर सिनेटची निवडणूक २०२३ ऑगस्ट मध्ये व्हायला हवी होती. पण ती तीनदा रद्द केली. दोन वेळा नोंदणी करायला लावली. हे झाल्यानंतर २२ सप्टेंबर रोजी सिनेट निवडणूक होईल, असे कोर्टाच्या निकालामुळेच ठरलं गेलं. काल रात्री मुंबई विद्यापीठाकडून एक परिपत्रक जारी करण्यात आले. त्यात त्यांनी शासनाचे पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत ही निवडणूक स्थगित होत आहे, असे म्हटले होते. मुंबई विद्यापीठाला जर स्वत:च मनं, डोकं, हृदय आणि कुलगुरू असतील तर मग शासनाकडून पुढील आदेशाची वाट का पाहायची आहे? ही निवडणूक स्थगित का गेली?” असा प्रश्न आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला.