राज्यस्तरीय कामगार केसरी आणि कुमार केसरी कुस्ती स्पर्धा यंदा २६ व २७ जानेवारीला सांगली येथे आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्र कामगार कल्याण निधी अधिनियम १९५३ अंतर्गत नोंदणीकृत असलेल्या नोंदित कंपन्या, कारखाने इत्यादी आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या कामगार व त्यांच्या पाल्यांना या स्पर्धेत भाग घेता येणार आहे.
कामगार मंत्री सुरेश खाडे आणि कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनीता वेद सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे, अशी माहिती मंडळाचे कल्याण आयुक्त रवीराज इळवे यांनी दिली आहे.
इच्छुक कुस्तीगिरांनी २२ जानेवारीपर्यंत मंडळाच्या ललित कला भवन, सांगली येथे प्रवेशिका सादर कराव्यात.स्पर्धेच्या प्रवेशिका, नियमावली यांची माहिती मंडळाच्या www.public.mlwb.in या संकेतस्थळांवर आणि मंडळाच्या राज्यातील सर्व विभागीय व गट कार्यालयांत तसेच कामगार कल्याण केंद्रात उपलब्ध आहेत. जिल्हा क्रीडा संकुल, सांगली-मिरज रोड, कृपामाई हॉस्पिटलसमोर, सांगली येथे या स्पर्धा होतील.
कामगार केसरी आणि कुमार केसरी किताब पटकावणाऱ्या कुस्तीगिरांना पारितोषिक रकमेसह चांदीची गदा, मानाचा पट्टा व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येईल. कामगार केसरी कुस्ती स्पर्धेचे प्रथम पारितोषिक ७५ हजार रुपये, द्वितीय पारितोषिक ५० हजार रुपये;
तर तृतीय पारितोषिक ३५ हजार व उत्तेजनार्थ पारितोषिक २० हजारांचे आहे. कामगार पाल्यांसाठी आयोजित कुमार केसरी स्पर्धेचे प्रथम पारितोषिक ५१ हजार, द्वितीय पारितोषिक ३५ हजार, तृतीय पारितोषिक २० हजार व उत्तेजनार्थ पारितोषिक १० हजार रुपयांचे आहे.