19 वर्षांनी ‘नवरा माझा नवासाचा’ या सिनेमाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमाची बरीच उत्सुकता प्रेक्षकांमध्ये होती. दरम्यान ‘नवरा माझा नवसाचा’ या सिनेमात रिमा लागू यांनी एका राजकीय नेत्याची भूमिका साकारली होती. त्याचप्रमाणे अभिनेता सिद्धार्थ जाधव याने नवरा माझा नवासाचा -2 या सिनेमात एका राजकिय नेत्याची भूमिका साकारली आहे. दरम्यान यासगळ्यामध्ये सिद्धार्थने राजकीय नेता म्हणून जे भारुड या सिनेमात सादर केलं आहे, त्याने विशेष लक्ष वेधून घेतलंय. महाराष्ट्राच्या राजकीय स्थितीवर भाष्य करणारं भारुड आहे, ज्याची सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरु आहे. या भारुडामध्ये सिद्धार्थने राजकीय नेता म्हणून गणपती बाप्पाकडे नवस केला आहे.
या भारुडामध्ये सिद्धार्थ म्हणतो की, देवा जर तू मला नवसाला पावला… त्यावर सचिन पिळगांवकर म्हणतात की, हे नवस बोलतायत की धमकी देतायत, त्यावर अशोक सराफ म्हणतात की, त्यांची ती स्टाईल आहे. पुढे सिद्धार्थ म्हणतो की, देवा जर तु पावला मला, सत्ताधारी खासदारकी लाभली मला…, मुकुट घालीन 50 खोक्यांचा तुला… तेव्हा स्वप्नील बोलतो की, हे नवस बोलतायत की लाच देतायत. त्यावेळी अशोक सराफ म्हणतात की, दुनियेत जसं चालतं तसंच साहेब बोलतात.
पुढे सिद्धार्थ म्हणतो की, जनतेचं भलं कराया… त्यावर स्वप्निल प्रश्न विचारतो की, जनतेचं म्हणजे नक्की कुणाचं? तेव्हा सचिन पिळगांवकर म्हणतात की, म्हणजे साहेबांचा मुलगा, मुलगी, बायको, सासू, सासरे, मेहुणे… त्यावर अशोक सराफ म्हणतात की, मग कार्यकर्त्यांचं भलं कोण करणार.. पुन्हा सचिन पिळगांवकर म्हणतात की, कार्यकर्त्यांचं भलं केलं तर साहेबांच्या सतरंज्या कोण उचलणार? जयवंत वाडकर जे सिद्धार्थचे सहकारी दाखवले आहेत ते म्हणतात की, साहेबांच्या सतरंज्या उचलणं आमचं भाग्य आहे.
जनतेचं भलं कराया, विरोधा पक्ष फोडाया, बुद्धी द्यावी गणराया, असं सिद्धार्थ बाप्पाजवळ बोलतो. तेव्हा सचिन पिळगांवकर म्हणतात की, देव अशी बुद्धी देत नाही. त्यावर स्वप्निल म्हणतो की,हे असंच जनतेला नडणार आणि देवाच्या नावाने बिलं फाडणार… पुढे सिद्धार्थ म्हणतो की, देवा फटाके फुटू धडामधुडूम, ढोल ताशे वाजू दे तडतड, आमचा झेंडा फडकूदे फडफड…, त्यावर सचिन पिळगांवकर म्हणतात की,झेंडा जास्त फडफडला तर फाटणार, पुढे स्वप्निल म्हणतो की, मग हे नवीन झेंडा घेऊन लोकांना लुटणार, हे परत देवाच्या नावाने बोंबलणार,असं अशोक सराफ म्हणतात.