परतीच्या पावसाने जिल्ह्याला झोडपले, शेती कामाला गती

कोल्हापूर जिल्ह्याला रविवारी परतीच्या पावसाने जोरदार झोडपले. या पावसाने पिकांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. माळरानावरील पिकांना होत असलेल्या या पावसाने बूस्ट मिळाला आहे.कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील घाटमाथ्यावर पावसाने जोर धरला आहे. कोल्हापुरातील राधानगरी, करवीर, शाहूवाडी, पन्हाळा, हातकणंगले, शिरोळ, गगनबावडा तालुक्यासह गडहिंग्लज, चंदगड आणि आजरा तालुक्यातही जोरदार पाऊस झाला. जिल्ह्यातील ११ धरण क्षेत्रांतही पाऊस आहे. जिल्ह्याच्या बऱ्याच भागात रविवारी पावसाने हजेरी लावली. दुसऱ्या आवर्तनातील पावसाची ही सुरुवात होती. सकाळी, दुपारी आणि रात्री ८ वाजल्यापासून पुन्हा जोरदार पावसाने झोडपले.

पश्चिम भागात दमदार पाऊस झाला. इचलकरंजीसह हातकणंगले तालुक्यात अनेक ठिकाणी तासभर पावसाने झोडपून काढले. त्यामुळे परिसर जलमय झाला. या पावसामुळे शेती कामालाही गती आली आहे. आजपासून पाच दिवस शक्य तेवढ्या शेती मशागती आणि खरीप पीक काढणी कामाचा उरक शेतकऱ्यांनी करावा असा सल्ला हवामानतज्ज्ञांनी दिला आहे.कोल्हापूर शहरात पावसाने रात्री नऊनंतर उशिरापर्यंत पावसाने जोरदार हजेरी लावत सर्वत्र पाणीच पाणी केले. यामुळे ठिकठिकाणी सखल भागात पाण्याची तळी साचली.

अचानक पडलेल्या पावसाने नागरिकांसह वाहनधारकांची तारांबळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले.सप्टेंबरच्या २४ तारखेपर्यंत मध्यम तीव्रतेने तर मुंबईसह कोकण, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत आहे. २६ ते २९ सप्टेंबरदरम्यानच्या तिसऱ्या आवर्तनातील चार दिवसांत जिल्ह्यात जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता जाणवते असा अंदाज निवृत्त हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिला आहे.