राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी 15 ते 20 दिवसात कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता असल्याने महाविकास आघाडीत जागा वाटपासाठी जोरदार खलबत्ते सुरू झालेले आहेत. खानापूर आटपाडी मतदारसंघावरून तिन्ही पक्षात तनातानी सुरू आहे. महाविकास आघाडीचे नेते खा. शरद पवार यांनी टीम तयार केली असून काही दिवसात संभाव्य उमेदवार व मतदार संघातील प्रतिनिधींचे मत विचारात घेऊन येत्या दहा ते पंधरा दिवसात जागांवरील तोडगा काढला जाणार आहे.
राज्यातील विधानसभेची मुदत ही 26 नोव्हेंबरला संपणार आहे. त्यापूर्वी राज्यात नवीन सरकार अस्तित्वात येणार आहे. दसरा संपल्यानंतर किंवा दसऱ्यापूर्वी निवडणुकीची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे. तर दिवाळी झाल्यानंतर मतदान होणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडी व महायुतीत जागा वाटपावरून चर्चेच्या फेऱ्या सध्या सुरू झालेल्या आहेत.
खानापूर आटपाडी मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे आ. स्व. अनिल बाबर विजयी झाले होते. पण ते ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात गेले होते. पण ठाकरेंना पुन्हा हा मतदारसंघ हवा आहे पण या ठिकाणी तगडा उमेदवार त्यांच्याकडे अद्याप नाही. याबरोबर काँग्रेस व राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे देखील उमेदवार नाही. आयात उमेदवारावर या ठिकाणी गणिते असणार आहेत. राज्यातील अनेक मतदारसंघात तिन्ही पक्षात वाद निर्माण झाले आहेत. त्या ठिकाणी महाविकास आघाडीचे नेते खा. शरद पवार यांनी इच्छुक उमेदवार व तेथील प्रतिनिधीशी चर्चा करून अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
महाविकास आघाडीचे उमेदवार तातडीने जाहीर करून उमेदवारांना प्रचारासाठी जास्तीत जास्त वेळ देण्याचे धोरण तिन्ही पक्षांच्या नेत्यांचे आहे त्यामुळे दसऱ्यापूर्वी सांगली जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या जागांचा व उमेदवारांचा तिढा संपण्याची शक्यता आहे.