अलमट्टी धरणाची उंची वाढणार! महापुराचा धोका वाढला ? कोल्हापूरचे आमदार हिवाळी अधिवेशनात झाले आक्रमक

कर्नाटकातील आलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा निर्णय महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांसाठी महापुराचे गंभीर संकट निर्माण करू शकतो, असा इशारा कोल्हापूरचे आमदार चंद्रदीप नरके यांनी दिला आहे.नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात त्यांनी केंद्र सरकारकडे आलमट्टी धरणाच्या उंचीवाढीला स्थगिती देण्याची मागणी केली.आमदार नरके म्हणाले, “आलमट्टी धरणाची सध्याची उंची ५१९ मीटर असूनही कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांना दरवर्षी पुराचा सामना करावा लागतो. धरणाची उंची ५२४ मीटरपर्यंत वाढवण्याचे कर्नाटक सरकारचे नियोजन आहे. यामुळे शेतजमिनी, पिके, गावे उद्ध्वस्त होण्याचा धोका आहे.

केंद्र सरकारने तत्काळ हस्तक्षेप करून हे काम थांबवावे. आमदार नरके यांनी वडनेर समितीने दिलेल्या अहवालाचा पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे. तसेच, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हायड्रोलॉजी (रूरकी) समितीने या विषयावर फेरअहवाल सादर करावा, अशी मागणीही त्यांनी अधिवेशनात केली.स्थानिक पातळीवर अनेक संघटना या निर्णयाविरोधात आवाज उठवत आहेत. त्यांनी सरकारकडे या प्रश्नावर कठोर भूमिका घेण्याची विनंती केली आहे. पूरग्रस्त भागातील नागरिकांनीही आपत्ती व्यवस्थापनासाठी प्रभावी उपाययोजनांची मागणी केली आहे.

आलमट्टी धरणाच्या उंचीवाढीच्या निर्णयावरून महाराष्ट्र-कर्नाटक वाद अधिक चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांच्या भविष्याला धोका पोहोचवणाऱ्या या निर्णयाविरोधात महाराष्ट्र सरकार काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष आहे.