नऊ दिवसानंतर मनोज जरांगे पाटलांचे उपोषण अखेर स्थगित

 मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे यांनी नवव्या दिवशी त्यांचं उपोषण थांबवलं आहे. त्यांची तब्येत खालावल्याने त्यांनी उपोषण स्थगित करावं अशी मागणी अंतरवाली सराटीमध्ये जमलेल्या मराठा बांधवांनी केली होती. त्यानंतर आत मनोज जरांगे यांनी त्यांचं आंदोलन स्थगित केलं. अंतरवालीमध्ये जमलेल्या महिला आणि बांधवांच्या हस्ते पाणी पिऊन जरांगेंनी हे आंदोलन स्थगित केलं. मनोज जरांगे यांच्यावर आता छत्रपती संभाजीनगरमधील रुग्णालयात उपचार केले जाणार आहेत. 

मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी गेल्या नऊ दिवसांपासून मनोज जरांगे त्यांच्या अंतरवाली सराटीत आंदोलनासाठी बसले होते. पण या काळात त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी सरकारने कोणतंही पाऊल उचललं नसल्याचं दिसून आलं. तर दुसरीकडे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनीही जरांगेंच्या विरोधात आंदोलन सुरू केलं.

दरम्यानच्या काळात मनोज जरांगे यांची तब्येत खालावली. त्यामुळे त्यांनी उपचार घ्यावेत असा आग्रह अंतरवालीत जमलेल्या बांधवांनी केला होता. या काळात जरांगेंना दोन वेळा सलाईनही लावण्यात आली. आता त्यांची तब्येत अधिकच खालावल्याने त्यांनी आपलं आंदोलन स्थगित केलं आहे.