अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका

बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचे एन्काऊंटर काही दिवसांपूर्वी झाले होते. त्यानंतर राज्यात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरु झाले. दुसरीकडे  या प्रकरणावर मुंबई उच्च न्यालालयाने राज्य शासनाला चांगलेच फटकारले होते. न्यायालयाकडून अनेक प्रश्न उपस्थित करत एन्काऊंटरसंदर्भात शंका उपस्थित केली होती. उच्च न्यायालय या प्रकरणावर तीन ऑक्टोंबर रोजी सुनावणी करणार आहे.

त्यापूर्वी मुंबईतील एका वकिलाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्या वकिलाने जनहित याचिका दाखल करत सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याची मागणी केली आहे.मुंबईतील वकील घनश्याम उपाध्याय हे अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात पोहचले आहे. त्यांनी या प्रकरणात जनहित याचिका दाखल केली आहे. या प्रकरणाचा तपास एसआयटीकडून पूर्ण होईपर्यंत संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करा, सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथकाची निर्मिती करा, अशी मागणी जनहित याचिकेतून करण्यात आली आहे.

अक्षय शिंदे यांच्या एन्काऊंटर प्रकरणी प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) दाखल करणे, या प्रकरणाचा तपास एसआयटीकडून करावा, त्या एसआयटीत केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) मधील अधिकाऱ्यांचा समावेश असावा, पोलीस कर्तव्य बजावताना बॉडी कॅमच्या वापराद्वारे पोलीस अधिकाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्याचे आदेश केंद्र सरकार तसेच राज्य सरकारांना द्यावेत, अशा मागण्याही घनश्याम उपाध्याय यांनी याचिकेत केल्या आहेत.