राज्य सरकारकडून राबवल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या (Mazi Ladki Bahin Yojana) तिसऱ्या हप्त्याचे वितरण चालू झाले आहे. अनेक महिलांच्या बँक खात्यात प्रतिमहा 1500 रुपये याप्रमाणे पैसे जमा होत आहेत. महिला आणि बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी जाहीर केल्यानुसार 29 सप्टेंबर रोजी सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होतील. दरम्यान, तिसऱ्या हप्त्याचे वितरण चालू झालेले असतानाच काही पात्र महिलांच्या बँक खात्यात 4500 रुपये जमा होत आहेत, तर काही महिलांना फक्त 1500 रुपयेच मिळत आहेत.
परिणामी अनेक महिलांमध्ये गोंधळ उडाला आहे. याच पार्श्वभूमीवर महिलांच्या बँक खात्यावर वेगवेगळी रक्कम का जमा होत आहे? सरकारचा नवा नियम काय आहे? हे जाणून घेऊ या.ऑगस्ट महिन्यात ज्या महिलांनी अर्ज केला होता, त्या महिलांना एकूण तीन हजार रुपये देण्यात आले होते. मात्र सरकारच्या नव्या नियमानुसार लाडकी बहीण योजनेसाठी 1 सप्टेंबरपासून अर्ज करणाऱ्या महिलांना सप्टेंबर महिन्यापासूनच लाभ मिळेल. म्हणजेच ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्यात अर्ज केलेला आहे, त्यांना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे 3000 हजार रुपये मिळणार नाहीत.
त्यामुळे सप्टेंबर महिन्यात अर्ज करणाऱ्यांना महिलांना फक्त 1500 रुपयेच मिळतील. लाडकी बहीण योजनेअंतर्गत अनेक महिलांना आतापर्यंत 3000 रुपये मिळालेले आहेत. मात्र 1 सप्टेंबरच्या अगोदर अर्ज केलेला असूनही अनेक महिलांच्या बँक खात्यात अद्याप पैसे आलेले नाहीत. अर्ज मंजूर झालेला असूनही या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळालेला नाही. आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक नसल्यामुळे तसेच अर्जातील इतर त्रुटींमुळे महिलांना हा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे वरील सर्व त्रुटी दुर केलेल्या महिलांना आता तिसऱ्या टप्प्यात 4500 रुपये मिळणार आहेत.
