उत्तरेतील भाजपच्या विजयाने महाराष्ट्रात राजकीय भूकंपाची चाहूल, काँग्रेसमधील आमदारांचा मोठा गट भाजपमध्ये जाणार?

मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये भाजपने दणदणीत विजय मिळवल्याचे दूरगामी परिणाम महाराष्ट्रातील राजकारणावर होणार असून महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये यामुळे अस्वस्थता वाढीस लागली आहे. विशेषतः महाराष्ट्रात शिवसेनेतील फुटीचा सिक्वेल म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट समोर आली होती. मात्र काँग्रेस पक्षात कोणतीही फूट पडली नव्हती. येत्या काही दिवसांमध्ये काँग्रेसमधील मोठा आमदारांचा गट भाजपकडे गेल्यास त्याचे आश्चर्य वाटायला नको, अशी कबुली काँग्रेसच्याच एका ज्येष्ठ नेत्याने दिली.

मध्य प्रदेश व छत्तीसगड काँग्रेस जिंकणारच असून राजस्थानमध्ये आम्ही जोरदार संघर्ष करत आहोत, असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले होते. त्यावर बहुतांश काँग्रेस नेते, कार्यकर्ते आणि त्यांचे सहानभुतीदार यांनी विश्वास ठेवला होता. भारत जोडो यात्रेनंतर राहुल गांधी यांना जमिनीवरील वास्तव फार चांगले समजू लागले असल्याचे काँग्रेस नेते व त्यांच्या सहानभुतीदारांनी म्हणायला सुरुवात केली होती. प्रत्यक्षात मात्र परिस्थिती याच्या विपरीत असल्याचेच आजच्या निकालांवरून सिद्ध झाले. मध्य प्रदेशात तर काँग्रेसचा उडालेला धुव्वा पाहता, काँग्रेसजनांना असलेला हा विश्वास नक्की कोणत्या कारणामुळे होता, असाच प्रश्न सर्व स्तरांतून विचारला जात आहे.

विधान परिषदेच्या जून २०२२मध्ये झालेल्या निवडणुकीत महाराष्ट्रातील काँग्रेसची सात ते आठ मते फुटली होती. अर्थात, त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला खिंडार पाडून राज्यातील सरकारच पाडल्यामुळे त्याकडे फारसे कुणी लक्ष दिले नाही. मात्र काँग्रेसने याची चौकशी करण्यासाठी मोहन प्रकाश समिती नेमली होती. त्याचा अहवाल केंद्रीय नेतृत्वाला देण्यात आला होता. मात्र त्या घरभेदी आमदारांच्या विरोधात कारवाई करण्याची हिंमत नेतृत्वाने दाखवली नाही. आता तीन राज्यांतील दमदार विजयानंतर त्या आमदारांसह आणखी काही मोठे नेते हे भाजपच्या गळाला लागणार असल्याची भीती काँग्रेसच्याच गोटातून व्यक्त केली जात आहे.

तीन राज्यात एकहाती विजय, १२ राज्यात कमळ फुललं, भाजपच्या उत्तरेतील विजयाचा नेमका अर्थ काय?

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार गटालाही या निकालांमुळे मोठे बळ मिळाले आहे. अजित पवार यांनी घेतलेला निर्णय किती योग्य होता, हेच यातून सिद्ध झाल्याचे त्यांच्या नेत्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे शरद पवार यांच्यापाशी उरलेल्या थोडक्या आमदारांमध्ये प्रचंड चलबिचल सुरू झाल्याचेही अजित पवार यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे. शरद पवार यांच्याशी एकनिष्ठता दाखवणाऱ्या आमदार खासदारांपैकी अनेकांनी यापूर्वीच अजित पवार यांनाच त्यांचे समर्थन असल्याची शपथपत्रेही सही करून दिल्याचे वृत्त महाराष्ट्र टाइम्सने यापूर्वीच दिले होते. त्यामुळे पवार यांच्यापाशी उरल्यासुरल्या आमदारांनाही गळती लागण्याची दाट शक्यता आहे.

दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ज्या हिंमतीने व उमेदीने भाजप विरोधात रणांगणात उतरले आहेत, त्यांच्या मनातील धाकधूकही यामुळे वाढणार आहे. शिवसेना उबाठाचे अनेक नगरसेवक शिंदे यांच्या पक्षात गेलेले आहेत. उरलेले जाण्याचा वेग यामुळे वाढणार आहे. तसेच, नगरसेवकांसोबत आता सध्याच्या निकालांचा फायदा घेत काही आमदारही गळाला लावण्याचा प्रयत्न शिंदे यांची शिवसेना व भाजपही करणार यात वाद नाही.