शरद पवार यांचे संकेत काय?; पवार घराण्यातून नव्या नेतृत्वावर मोठी जबाबदारी?

राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ सुरू आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतर नवीन नेतृत्वाला संधी मिळाली आहे. अनेक ठिकाणी नवीन चेहऱ्यांवर जबाबदारी टाकण्यात येत आहे. नव्या दमाचे नेतृत्व ही राजकीय पोकळी भरून काढण्यासाठी कितपत सक्षम आहे याचे प्रयोग आणि चाचपणी सुरू आहे. त्यातच आता पवार घराण्यातून नवे नेतृत्व समोर येत आहे. दस्तुरखुद्द शरद पवार यांनीच याविषयीचे संकेत दिले आहे. रोहित पवार यांना विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मोठी जबाबदार मिळण्याचे संकेत मिळत आहेत.

रोहित पवार यांची पहिली पाच वर्ष तुमची सेवा करण्यात पुढची पाच वर्ष महाराष्ट्राची सेवा करण्यात जातील असे स्पष्ट संकेत शरद पवार यांनी दिले आहेत. इंदिरा गांधी नगर दक्षिणचा दुष्काळी दौरा करायला आल्या होत्या. आता चित्र पालटलं आहे, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले. रोहित पवारांनी 2700 कोटींचा निधी या मतदार संघात आणला. जलसंधारणासाठी 300 कोटी रुपये आणले, हे सांगायला ते विसरले नाहीत. त्यांनी रोहित पवार यांच्या कामाचं तोंडभरून कौतुक केले आहे. रोहितची पहिली पाच वर्ष ही तुमची सेवा करायची होती आणि त्या नंतरची पाच वर्ष महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी देणार असल्याचे सुतोवाच त्यांनी केले. समाजाचं काम करत असतांना जे कर्तृत्व दाखवतात तेच राजकारणात टिकतात, असे त्यांनी ठाम पणे सांगितलं. उभं करायला अक्कल लागते, उभं केलेलं उद्ध्वस्त करायला अक्कल लागत नाही. रोहित पवार चांगले काम करत आहे त्याला मदत करता आली नाही तर त्याच्या कामात खोडा घालू नका. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अप्रत्यक्षपणे राम शिंदे यांच्यावर निशाणा साधला.