पंचगंगा नदी पात्राच्या बाहेर! 38 बंधारे पाण्याखाली

सध्या सगळीकडेच पावसाचा जोर सुरू असलेला पाहायला मिळत आहे. यंदाच्या पावसाळ्यामध्ये पंचगंगा नदी पहिल्यांदाच पात्राच्या बाहेर पडली आहे. कोल्हापूर शहरामध्ये पावसाचा जोर कमी असला तरी धरण क्षेत्रात आणि घाटमाथ्यांवर जोरदार सरी कोसळत आहेत.

शहरातील पंचगंगा घाट येथे पाणी पात्रा बाहेर पडल्यानं आजूबाजूच्या परिसरात पाणी शिरलं आहे. तर परिसरातील पाणी बघण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मात्र, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परिसरात पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहे.

तसेच NDRF ची एक तुकडी देखील कोल्हापुरात दाखल झालीय. त्यासोबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष सज्ज असल्याचं, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांनी सांगितलंय.

त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वेगाने वाढ झाली आहे. राजाराम बंधाऱ्याव पंचगंगा नदी 29 फुटांवरून वाहत आहे.पावसाचा जोर असल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील 38 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. मुळे धोकादायक मार्गांवरून वाहतूक करू नये, असे आवाहन कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

दरम्यान, आज (7 जुलै) सकाळी गगनबावडा तालुक्यातील वेसरफ तलाव 100 टक्के भरला. प्रकल्पाच्या सांडव्यावरून 125 क्यूसेक्स इतका विसर्ग होत आहे. त्यामुळे नदीपात्रातील पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा व सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

या तलाव परिसरात पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. दुसरीकडे, चंदगड तालुक्यात घटप्रभा धरण पूर्ण क्षमतेनं भरल्यानंतर जांबरे धरणही पूर्ण क्षमतेनं भरले आहे. या धरणाची क्षमता 0.820 टीएमसी आहे.

आज दुपारी 12 वाजता पंचगंगेची पाणी पातळी 28 फूट 7 इंचावर गेली आहे. पंचगंगा नदीची इशारा पातळी 39 फूट आहे तर, धोका पातळी 43 फूट इतकी आहे. त्यामुळं प्रशासन देखील अलर्ट मोडवर आले आहे.

ज्या मार्गावर आणि बंधाऱ्यावर पाणी आले आहे असे मार्ग बंद करून वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. पंचगंगा नदीचं पाणी दुपारी 12 च्या सुमारास पात्रा बाहेर पडले. त्यामुळं प्रशासनाच्या वतीनं नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.