‘सीआयडी’ (CID) या लोकप्रिय मालिकेच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेले अभिनेते दिनेश फडणीस (Dinesh Phadnis) यांचे निधन झाले आहे. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अखेर उपचारादरम्यान वयाच्या 63 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने मनोरंजनसृष्टीला मोठा धक्का बसला आहे.
दिनेश फडणीस यांचा जन्म 2 नोव्हेंबर 2023 रोजी झाला. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्यांमध्ये दिनेश यांची गणना होते. वर्षानुवर्षे प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या ‘सीआयडी’ (CID) या लोकप्रिय मालिकेत त्यांनी काम केलं आहे. या मालिकेत त्यांनी इंस्पेक्टर फ्रेड्रिक्सची भूमिका साकारली होती. फ्रेड्रिक्सची भूमिका साकारण्यासह त्यांनी या मालिकेचं कथानकही लिहिलं आहे.
दिनेश फडणीस यांना छोट्या पडदा गाजवण्यासोबत रुपेरी पडदादेखील गाजवला आहे. ‘सरफरोश’ आणि ‘सुपर 30’ या सिनेमात ते झळकले आहेत. तसेच एका मराठी सिनेमाचं लेखन त्यांनी केलं आहे. छोट्या पडद्यावरील ‘सीआयडी’ आणि ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या मालिकेत त्यांनी काम केलं आहे. 1998 ते 2018 मध्ये सीआयडी या मालिकेत त्यांनी इंस्पेक्टर फ्रेड्रिक्सची भूमिका साकारली. 2005 मध्ये आलेल्या ‘सीआयडी : विशेष ब्यूरो’ या भागात ते सब-इंस्पेक्टर फ्रेड्रिक्सच्या भूमिकेत होते. त्यांनंतर ‘अदालत’ आणि ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकांमध्येही त्यांनी इंस्पेक्टर फ्रेड्रिक्सची भूमिका साकारली आहे. ‘सीआयएफ’ या मालिकेत ते कांस्टेबल शंभू तावडेच्या भूमिकेत होते.
दिनेश यांनी 1993 मध्ये ‘फासले’ या शोच्या माध्यमातून आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर ‘CID’ ही मालिका त्यांना मिळाली. या मालिकेच्या माध्यमातून 20 वर्षे त्यांनी प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन केलं. ‘सरफरोश’ या सिनेमाते आमिर खानसोबत स्क्रीन शेअर करताना दिसले. त्यानंतर हृतिक रोशनच्या ‘सुपर 30’ या सिनेमात त्यांनी काम केलं. दिनेश यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुलं आहेत.
दिनेश फडणीस सोशल मीडियावर चांगलेच अॅक्टिव्ह होते. आपल्या लेकीसोबत वेळ घालवतानाचे फोटो आणि व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. इंस्टाग्रामवर त्यांचे 88.9k फॉलोअर्स असून 179 पोस्ट त्यांनी केल्या आहेत. दिनेश फडणीस यांचा अभिनय चाहत्यांच्या पसंतीस उतरल्याने अनेक वर्षे त्यांनी इंस्पेक्टरची भूमिका साकारली. आपल्या भूमिकेला पूर्णपणे न्याय देण्याचा प्रयत्न त्यांनी प्रत्येकवेळी केला आहे.