सुहासभैया बाबर यांनी ना. नितीन गडकरी यांच्याकडे केली मागणी…

विटा शहर हे जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर मानले जाते. सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर असणाऱ्या या शहराला मोठे महत्त्व आहे. त्यामुळे शहराला रिंग रोड असावा अशी स्व. आमदार अनिलभाऊ बाबर यांची इच्छा होती. त्यासाठी त्यांचे प्रयत्नही सुरू होते. त्या अनुषंगाने सुहासभैया बाबर यांनी ना. गडकरी यांना एक पत्र दिले व विटा शहराच्या बाहेरून रिंग रोडचे निकष समजावून सांगितले.

सुहास बाबर यांनी ना. गडकरी यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, विटा शहर विस्ताराने मोठे असून जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. या शहराचे नागरिकरण मोठ्या प्रमाणात होत आहे. फलटण, दहिवडी, विटा, म्हैसाळ राष्ट्रीय महामार्ग 160 आणि कराड, विटा, नागज राष्ट्रीय महामार्ग 166 हे दोन महामार्ग विटा शहरातून जातात. त्यामुळे शहरात अवजड वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात होत आहे.

वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन अपघाताचे तसेच वाहतुकीची कोंडी होण्याचे प्रमाण वाढलेले आहे. त्यासाठी विटा शहराच्या बाहेरून रिंग रोड करण्यासाठी शहरातील व परिसरातील नागरिकांनी वारंवार मागणी केली आहे. तरी रिंगरोड साठी सहकार्य व्हावे अशी मागणी बाबर यांनी केली आहे.