विट्यातील एमडी ड्रग्ज प्रकरण खूपच हैराण करणारे होते. याचा छडा लावणे खूपच महत्वाचे ठरले होते. खानापूर तालुक्यातील विट्याजवळील कार्वे येथील एमडी ड्रग्ज प्रकरणाचे मुंबई कनेक्शन स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने उघडकीस आणले. संशयित जितेंद्र शरद परमार (वय ४१, रा. नागडोंगरी, ता.अलिबाग, सध्या रा. ताहिर बेकरीच्यावर माहिम १६ मुंबई), अब्दुलरज्जाक अब्दुलकादर शेख (वय ५३, रा. उस्मानिया मशिदजवळ, पाठणवाडी, फिल्डरवाडा, पवई, मुंबई) आणि सरदार उत्तम पाटील (वय ३४, रा. शेणे, ता. वाळवा, जि. सांगली) या तिघांना अटक करण्यात आली.
या कारवाईबाबत माहिती देताना पोलिस अधीक्षक संदीप घुगे म्हणाले, विटाजवळील कार्वे येथील औद्योगिक वसाहतीमध्ये बंद कारखान्यात एमडी ड्रग्ज बनवणाऱ्या रहुदिप बोरिचा (रा. कोसंबा, जि. सुरत) सुलेमान शेख (रा. बांद्रा, मुंबई), बलराज अमर कातारी (वय २४, रा. विटा) या तिघांना दि. २७ रोजी अटक करण्यात आली.
त्यांनी बनवलेले २९ कोटी रूपयांचे १४ किलो ५०० ग्रॅम एमडी जप्त करण्यात आले. स्थानिक गुन्हे अन्वेषणकडे या प्रकरणाचा तपास सोपवण्यात आला. त्यांनी तिघांची कसून चौकशी केली. तेव्हा आणखी तिघे संशयित जितेंद्र परमार, अब्दुलरज्जाक शेख, सरदार पाटील यांची नावे निष्पन्न झाली. या सहाजणांची मुंबईतील ऑर्थर रोड कारागृहात ओळख झाली होती. सहाजणांनी जामिनावर मुक्त झाल्यानंतर एकत्र येऊन एमडी ड्रग्जचा कारखाना सुरू करण्याचे ठरवले. त्यानुसार रहुदिप याने दिल्ली येथून मशिनरी मागवली. सुलेमान शेख याने दिल्लीतील कंपनीस पैसे पाठवले. त्यानंतर दोघांनी बलराजच्या मदतीने विटा येथे मशिनरी बसवली.
मशिनरी बसवण्यासाठी जितेंद्र याने आर्थिक मदत केली. सरदार पाटील याला ड्रग्ज विषयी माहिती असल्यामुळे त्याने दोन-तीनवेळा येथे येऊन मार्गदर्शन केले. तर बलराज हा अब्दुलरज्जाक शेख याला पुणे, मुंबईत जाऊन माल देत होता. जितेंद्र, अब्दुलरज्जाक व सरदार या तिघांना फलटण येथून ताब्यात घेण्यात आले.
अधीक्षक घुगे म्हणाले, आतापर्यंत सहाजणांना अटक केली असून आणखी कोणाचा सहभाग आहे काय? त्यांना आर्थिक मदत कोणी केली? कच्चा माल कोण पुरवत होते? त्यांनी कार्वे येथून कोणाला ड्रग्ज विकले आहे काय? याचा तपास केला जाणार आहे. यावेळी स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे आणि अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.