दोन-चार दिवसांमध्ये आचारसंहिता लागू होईल – अजित पवार

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक संदर्भात निवडणूक आयोग केव्हाही आचारसंहिता जाहीर करु शकतो. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या विधानांद्वारे याबाबत स्पष्ट संकेत दिले आहेत.आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. ज्यामध्ये, भेटीगाठी, सभा, मेळावे आणि पदयात्रांचा समावेश आहे. दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी आणि महायुती यांची आपापल्या घटकपक्षांमध्ये जागावाटपाबाबतही चर्चा सुरु आहे. त्यामुळे आता निवडणुकीबाबत निर्णय जाहीर होण्याचा अंतिम टप्पा आला आहे, असे मतदारांनाही जाणवू लागले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने एक उद्योग मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यादरम्यान काही नागरिकांनी आपापल्या मागण्यांचे, प्रश्नासंबंधी निवेदने दिली. हाच धागा पकडत उपस्थितांना उद्देशून बोलताना अजित पवार यांनी म्हटले की, आपण इतक्या मोठ्या प्रमाणात निवेदने देता आहात खरे. पण त्यावर कार्यवाही होऊन निश्चित वेळेत काम होईल, असे वाटत नाही. कारण आता चारदोन दिवसांमध्येच आचारसंहिता लागू होईल. त्यामुळे ही कामे करण्यास विलंब लागू शकतो. त्यामुळे कामे इतक्यात होणं काहीसे अवघड आहे, असेही ते म्हणाले.