कोल्हापुरात आज शाही दसरा सोहळा! ऐतिहासिक दसरा चौकात तयारी पूर्ण…..

कोल्हापूर येथील ऐतिहासिक दसरा चौकात आज शनिवारी सायंकाळी शाही दसरा सोहळा होणार आहे. परंपरेप्रमाणे सूर्यास्तावेळी सायंकाळी सहा वाजून अकरा मिनिटांनी सोहळा होणार आहे.प्रशासनाच्या वतीने सायंकाळी पाच वाजता भवानी मंडप ते दसरा चौक या मार्गावर शाही स्वारी होणार आहे. त्यामध्ये आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय पदक विजेते खेळाडू, ढोलवादन पथके, लेझीम पथके, झांज पथक, शिवकालीन वेशभूषेमधील मावळे, मर्दानी खेळाची पथके, मल्लखांब पथके, अकरा घोड्यांसमवेत अकरा मावळे, दहा मावळे-आब्दागिरीसह सहभागी होणार आहेत.

साडेपाचच्या सुमारास श्री तुळजाभवानी, श्री अंबाबाई आणि गुरुमहाराज वाड्यातील पालख्या दसरा चौकाकडे येतील. न्यू पॅलेस ते दसरा चौक या मार्गावरून दीडशे बुलेटस्वार, पोलिस एस्कॉर्ट व छत्रपतींच्या घराण्यातील वाहनांची रॅली होईल. यावेळी एनएसएस, एनसीसी, स्काऊट गाईडचे विद्यार्थी मानवंदना देतील. दसरा चौकात छत्रपती परिवाराचे आगमन झाल्यानंतर खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते शमीपूजन होऊन सोने लुटण्याचा पारंपरिक सोहळा होईल. दरम्यान, सोहळ्यासाठी दसरा चौकात तयारी पूर्ण झाली असून, परिसरात करमणुकीच्या साधनासह खाद्यपदार्थांच्या स्टॉलनी हजेरी लावली आहे.