अजितदादा गटाला कोल्हापूरात मोठा धक्का!

लोकसभा निवडणुकीतील निराशानजक कामगिरीनंतर टीकेच्या केंद्रस्थानी असलेल्या अजित पवार यांना आता आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. अजितदादा गटातील एक बडा नेता महाविकास आघाडीच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

त्यामुळे विधानसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रात नव्या जोमाने उतरण्याच्या तयारीत असलेल्या अजित पवार यांच्या मनसुब्यांना धक्का बसू शकतो. सूत्रांच्या माहितीनुसार, कोल्हापूरमधील बिद्री कारखान्याचे अध्यक्ष आणि माजी आमदार के.पी. पाटील (K P Patil) हे महाविकास आघाडीच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.

के.पी. पाटील यांनी अलीकडेच राज्य सरकार आणि महायुतीवर सडकून टीका केली होती. त्यांचा एकूण रागरंग पाहता ते विधानसभा निवडणुकीपूर्वी मविआ आघाडीतील एका पक्षात प्रवेश करु शकतात. कोल्हापूर जिल्ह्यात हसन मुश्रीफ यांच्यानंतर के.पी. पाटील हे अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्यातील सर्वात मोठे नेते आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर के पी यांची महाविकास आघाडीशी जवळीक वाढल्याचे सांगितले जाते. त्यामुळे आगामी काळात के पी पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यास तो अजित पवार यांच्यासाठी मोठा धक्का ठरेल.