देवेंद्र फडणवीसांकडून राज्यातील होमगार्ड्सना भेट, मानधन होणार दुप्पट, आता प्रतिदिन 570 ऐवजी…

राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांच्या बरोबरीने होमगार्ड्स देखील महत्त्वाची भूमिका बजावत असतात. असे असले तरी गेल्या काही दिवसांपासून होमगार्ड्सचे मानधन वाढविण्यासंदर्भात मागणी केली जात होती. आज अखेर दसऱ्याच्या मुहूर्तावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून ही मागणी मान्य करण्यात आली आहे. राज्यातील होमगार्ड्सचे मानधन दुप्पट करण्यासंबंधीचा शासन आदेश जारी करण्यात आला आहे. प्रतिदिन 570 रुपये मिळणारं मानधन आता 1 हजरा 083 रुपये इतके करण्यात आले आहे. आता हे मानधन देशात सर्वाधिक आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट द्वारे म्हटले आहे. याशिवाय विविध भत्त्यांची रक्कम सुद्धा दुप्पट करण्यात आली आहे. उपहार भत्ता 100 वरून 200 रुपये तर भोजन भत्ता 100 वरून 250 रुपये इतका करण्यात आला आहे. राज्यातील सुमारे 55 हजार होमगार्डना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे. 1 ऑक्टोबर 2024 पासून ही वाढ देण्यात येणार असून गेल्याच महिन्यात सुमारे 11 हजार 207 होमगार्ड्सची भरती प्रक्रिया सुद्धा पूर्ण करण्यात आल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवरून दिली.