गेल्या काही महिन्यांपासून लंडनहून छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं महाराष्ट्रात येणार असल्याचे बोललं जात आहे. आता अखेर सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांबाबत विधानसभेत निवेदन सादर केलं. यावेळी त्यांनी ही वाघनखं महाराष्ट्रात कधी, कुठे आणि किती काळ दर्शनासाठी ठेवली जाणार आहेत? याची माहिती दिली. तसेच ही वाघनखं आणण्यासाठी नेमका किती खर्च आला, याबद्दलही घोषणा करण्यात आली.
येत्या १९ जुलैला ही वाघनखं साताऱ्याच्या शासकीय म्युझियममध्ये छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि तिथले सरदार यांच्या उपस्थितीत ही वाघनखं दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे, असेही सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी वाघनखं भारतात आणण्यासाठी कोट्यावधी रुपयांचा खर्च करण्यात आल्याच्या मुद्द्यावरही भाष्य केले.
आपल्या अधिवेशनाचा एका दिवसाचा खर्च जेवढा आहे, त्याच्या कितीतरी पट कमी खर्च हा वाघनख आणण्यासाठी झाला. वाघनखं आणण्यासाठी 14 लाख 8 हजारांचा खर्च झाला. ही वाघनखं आणण्यासाठी कुठल्याही प्रकारचे भाडे दिले जाणार नाही. ते कधीही दिले जात नव्हते, असेही सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले.