खानापूर आटपाडी मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाने या अगोदरच दिवंगत आ. अनिल बाबर यांचे पुत्र सुहास बाबर यांना उमेदवारी घोषित केली आहे. गेल्या आठवड्यात आटपाडीतील ज्येष्ठ नेते राजेंद्रअण्णा देशमुख यांनी भाजपला सोडचिट्ठी देत राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी शरद पवार गटाला ही जागा सुटण्याची शक्यता आहे. राजेंद्र अण्णा देशमुख यांची आटपाडी परिसरात मोठी ताकद आहे. अॅड. वैभव पाटील यांचे वडील माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी तब्बल दोन टर्म या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले असल्याने त्यांना मानणारा मोठा वर्ग दोन्ही तालुक्यांमध्ये आहे.
राजेंद्र अण्णा देशमुख आणि वैभव सदाशिवराव पाटील यांनी एकमताने ही निवडणूक लढल्यास सुहास बाबर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या भूमिकेचा देखील मोठा परिणाम या निवडणुकीच्या निकालावर असणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दिवंगत आ. अनिल बाबर विश्वासू सहकारी होते. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे या मतदारसंघाकडे विशेष लक्ष आहे. त्यामुळे खानापूर आटपाडी मतदारसंघातील लढाई प्रतिष्ठेची मानली जात आहे.