आटपाडी येथील सांगोला चौकात शनिवारी पहाटे चौथरा उभारून डॉ. आंबेडकर यांचा अर्धाकृती पुतळा बसवला होता. आटपाडी येथील सांगोला चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा बेकायदेशीर बसवलेला पुतळा काढल्यानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केल्याप्रकरणी ४७ जणांवर आटपाडी ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.उपनिरीक्षक सागर खाडे यांनी फिर्याद दाखल केली आहे.
भारताचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसविण्यासाठी शासकीय जागेची मागणी सुरू आहेत. याबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी व जिल्हाचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी मागणी केली आहे. जागा मिळेपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा सांगोला चौक येथेच सुरक्षीत सन्मानपूर्णक ठेवावा अशी सूचना प्रशासनाकडे केली आहेत. याबाबत प्रशासनाने समाज बांधवाच्या भावनांचा विचार करून सुव्यवस्था राखली पाहिजे.
आटपाडी तहसिलदार कार्यालय परिसरात शासकीय जागेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा सन्मानाचे उभा केला पाहिजे. याबाबत जिल्हाधिकारी व पालकमंत्र्यांकडे मागणी केली असल्याचे रिपाईचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात यांनी सांगितले. त्यांनी सामजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्याकडे सदर घटनेचा घटनाक्रम सांगितला.
मंत्री आठवले यांनी तात्काळ जिल्हाधिकारी व पालकमंत्री यांच्याकडे शासकीय जागेची मागणी केली असून तोपर्यंत सांगोला चौक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा सुरक्षित राहण्याच्या प्रशासनाला सुचना दिल्या आहेत. याबाबत समाज बांधवाच्या भावना दुखावल्या जातील अशा कोणत्याही गोष्टी प्रशासनाने करू नये असे स्पष्ट मंत्री आठवले यांनी सांगितले आहे.