दहावीची २१ फेब्रुवारी तर बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारीपासून

इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांची बोर्डाची परीक्षा यंदा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च या काळात पार पडणार आहे. तत्पूर्वी, २४ जानेवारीपासून १० फेब्रुवारीपर्यंत या विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा होईल. तर दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा २१ फेब्रुवारीला सुरु होऊन १७ मार्च रोजी संपणार आहे. त्याअगोदर ३ ते २० फेब्रुवारीदरम्यान त्यांची प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा होणार आहे. गतवर्षी दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा १ मार्चपासून तर बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरु झाली होती. यंदा १० दिवस अगोदर या विद्यार्थ्यांची परीक्षा होणार असून त्यासंदर्भातील अंतिम वेळापत्रक बोर्डाकडून काही दिवसांत जाहीर होईल.