कोणत्याही व्यवहारासाठी आजपासून लागणार ५०० रुपयाचा स्टॅम्प पेपर

लाडकी बहीणसारख्या लोकप्रिय योजनांचा सत्ताधाऱ्यांनी पाऊस पाडल्याने १००, २०० रूपयांचे मुद्रांक बंद करून सर्व व्यवहार आता ५०० रुपयांच्या मुद्रांकावर करावे लागणार आहेत.महसूल मिळवण्यासाठी सरकारने मुद्रांकाची किंमत वाढवली असून त्याची अंमलबजावणी आज बुधवारपासून सुरू होत आहे.महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमांमध्ये आणखी सुधारणा करण्यासाठीचा अध्यादेश राज्यपालांनी सोमवारी काढला.

सर्वसाधारण व्यवहारासाठी जसे की, प्रतिज्ञापत्र, भाडे करार, विविध कर्ज प्रकरणांसाठी लागणारी प्रतिज्ञापत्रे, शैक्षणिक कामांसाठी लागणारी प्रतिज्ञापत्रे, संचकार पत्र, विक्री करार अशा एक ना अनेक कामांसाठी सरसकट १०० रुपयांच्या मुद्रांकांचा वापर केला जात होता.

परंतु त्याच कामांसाठी आता लोकांना जादा ४०० रुपये मोजावे लागणार आहेत. हक्क सोडपत्रासाठी आतापर्यंत २०० रुपयांचा मुद्रांक वापरला जात होता, त्यासाठीही आता ५०० रुपये लागणार आहेत.पूर्वी केलेल्या करारपत्राचा आता अंतिम विक्री दस्त करायचा झाल्यास त्यांनाही वाढीव मुद्रांक भरावा लागेल. मुद्रांक शुल्क बसविण्यात सुलभता व एकरूपता आणण्याच्या आणि शासनाचा महसूल वाढविण्याच्या दृष्टीने ही सुधारणा करण्यात आल्याचे या अध्यादेशात म्हटले आहे.