राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून राज्यभरात काढण्यात येत असलेल्या शिवस्वराज्य यात्रेची शेवटची सभा होत आहे. राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत आज वाळवा- इस्लामपूर मतदारसंघात हि सांगता सभा होणार आहे.प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे, खासदार निलेश लंके, खासदार धैर्यशील मोहिते पाटील असे दिग्गज नेते या सांगता सभेला उपस्थित राहणार असून आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर पहिलीच सभा असल्याने यात कार्यकर्त्यांना काय संदेश देणार याकडे लक्ष लागून आहे.
दरम्यान कालच निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. निवडणूक जाहीर झाल्यानंतर शरद पवार आणि जयंत पाटील यांची ही पहिलीच सभा असणार आहे. त्यामुळे शिवस्वराज्य यात्रेची ही सांगता सभा असली तरी आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळच या सभेत फोडला जाईल असे समजू शकतो. आता या सभेत शरद पवार आणि जयंत पाटील हे दोन्ही प्रमुख नेते कार्यकर्त्यांना काय आदेश सोडणार यावर संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.