कोल्हापूर जिल्ह्यात विधानसभेसाठी महायुतीमध्ये शिवसेना मोठा भाऊ ठरण्याची चिन्हे आहेत. जागा वाटपात दहापैकी तब्बल चार जागा शिवसेनेला मिळण्याची शक्यता आहे. भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि जनसुराज्य शक्ती पक्षाला प्रत्येकी दोन जागा जातील.त्यामुळे जिल्ह्यात महायुतीअंतर्गत शिवसेना वरचढ ठरणार असून त्यांच्यावर प्रामुख्याने युतीची भिस्त राहणार आहे. दरम्यान, हातकणंगले मतदारसंघावरही शिवसेनेने दावा केला असून ती जागा मिळाल्यास शिवसेनेला दहापैकी पाच विधानसभा मतदारसंघ मिळण्याची शक्यता आहे. बंडखोरी टाळण्यासाठी ज्या पक्षाचा आमदार तो मतदारसंघ त्या पक्षाला, असा फॉर्म्युला दोन्ही बाजूने स्वीकारण्यात आला आहे.
त्यानंतर निवडूण येणारा तुल्यबळ उमेदवार असलेला मतदारसंघ त्या पक्षाला सोडण्यात येणार आहे.कोल्हापूर उत्तर मतदारसंघात राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर हे गेले साडेचार वर्षे तयारी करत आहेत. त्यामुळे शिवसेनेतून त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होईल. करवीरमध्ये माजी आमदार चंद्रदीप नरके शिवसेनेचे उमेदवार असतील. राधानगरीतून आमदार प्रकाश आबिटकर पुन्हा मैदानात उतरतील. शिरोळमधून आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर हे शिवसेनेच्या चिन्हावर किंवा अपक्ष म्हणून लढतील. ते अपक्ष लढणार असतील, तर त्यांना शिवसेनेच्या कोट्यातून उमेदवारी मिळेल.
दरम्यान, यड्रावकर यांनी स्वतंत्र पक्ष स्थापन केला आहे.कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार अमल महाडिक हे भाजपकडून रणांगणात उतरणार आहेत. इचलकरंजीतून नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले आमदार प्रकाश आवाडे यांचे पुत्र राहुल आवाडे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडेल. कागलमधून राष्ट्रवादी अजित पवार गटातून मंत्री हसन मुश्रीफ, तर चंदगडमधून आमदार राजेश पाटील रिंगणात असतील.
जनसुराज्य शक्ती पक्षही महायुतीमध्ये असल्याने शाहूवाडी-पन्हाळा आणि हातकणंगले मतदारसंघ त्यांच्यासाठी भाजपने सोडला आहे. शाहूवाडी-पन्हाळा मतदारसंघातून आमदार विनय कोरे, तर हातकणंगलेमधून दलितमित्र अशोकराव माने यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, हातकणंगलेची जागा शिवसेनेकडे गेल्यास माने यांना धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवावी लागेल.