Vidhan Sabha Election 2024: मतदान केंद्रांवर मोबाइला बंदी

लोकसभा निवडणुकीत मतदान केंद्रांवर मतदान करताना काही जणांनी मोबाइलवर ईव्हीएमचे चित्रीकरण केले होते. ते व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्याने मतदान प्रक्रियेतील गोपनीयतेचा भंग झाला होता.असे प्रकार पुन्हा होऊ नयेत, यासाठी विधानसभा निवडणुकीत मतदान केंद्रांवर मतदारांना मोबाइलसह प्रवेश दिला जाणार नाही.

निवडणूक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्यास त्यांच्यावरही कारवाई करण्याचा इशारा पोलिस अधिकाऱ्यांनी दिला आहे. मतदान प्रक्रिया गोपनीय ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाकडून विशेष प्रयत्न केले जातात. त्यासाठी मतदान केंद्रांवर मोबाइलसह प्रवेश दिला जात नाही. मात्र, लोकसभा निवडणुकीत काही ठिकाणी निवडणूक कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे मतदार थेट ईव्हीएमपर्यंत मोबाइल घेऊन गेले. मतदान प्रक्रियेचे चित्रीकरण करून ते व्हिडिओ व्हॉट्सॲपच्या स्टेटसला ठेवले. सोशल मीडियात व्हायरल केले.

हा प्रकार लक्षात येताच पोलिसांनी ११ जणांवर गुन्हे दाखल करून त्यांना चौकशीसाठी बोलावले.मतदान प्रक्रियेत गोपनीयतेचा भंग केल्याबद्दल त्यांच्यावर न्यायालयात आरोपपत्र दाखल केल्याची माहिती पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिली. विधानसभा निवडणुकीत असे प्रकार टाळण्यासाठी मतदारांना मतदान केंद्राबाहेरच मोबाइल ठेवावा लागणार आहे. याची खबरदारी केंद्रावरील निवडणूक कर्मचारी, अधिकारी आणि पोलिसांना घ्यावी लागणार आहे.

मतदान केंद्रात मोबाइलसह मतदार येणार नाहीत, यासाठी निवडणूक कर्मचारी आणि पोलिसांना खबरदारी घ्यावी लागणार आहे. मतदारांना सूचना देणे, त्यांना बाहेरच मोबाइल ठेवण्यास सांगणे, तपासणी करण्याचे काम कर्मचाऱ्यांना करावे लागणार आहे. अन्यथा कर्मचाऱ्यांना दोषी ठरवले जाणार आहे.