सांगोला विधानसभा मतदारसंघ हा शेकापचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. गणपतराव देशमुख यांनी दोन निवडणूक वगळता या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. यापूर्वी आघाडीच्या जागावाटपात ही जागा शेकापसाठी सोडली जायची. मात्र आता आघाडीमध्ये शिवसेना (ठाकरे) दाखल झाल्याने नवा पेच निर्माण झालेला आहे. शेकापकडून मतदारसंघात आघाडीकडून प्रचार सुरू केलला असताना आता शिवसेनेच्या या नव्या पवित्र्यामुळे आघाडीच्या एकजुटीला धक्का लागणार आहे. राष्ट्रवादी कॉग्रेस (अजित पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे यांनी नुकताच पक्ष आणि पदाचा राजीनामा दिला. यानंतर लगोलग त्यांनी आपण निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले.
साळुंखे यांनी शिवसेना (ठाकरे) पक्षात प्रवेश करत मशाल हातात घेताच सांगोल्याच्या राजकारणास नवे वळण लागले. त्यांच्या या पक्ष प्रवेशानंतर पक्षाकडून आघाडीच्या वतीने सांगोला मतदारसंघात शिवसेना (ठाकरे) पक्ष निवडणूक लढणार असल्याचे जाहीर करण्यात आले. शिवसेनेच्या या भूमिकेमुळे सांगोल्यात नवा वाद तयार झाला आहे. सांगोला मतदारसंघ शिवसेना आणि शेकाप हे दोन्ही पक्ष परंपरागत लढत असल्याने आता ते दोघेही एकाच आघाडीत आल्याने हा संघर्ष तयार झाला आहे.
यात आता शिवसेनेने आपली भूमिका जाहीर केल्याने सांगोल्याचे राजकारण लोकसभेवेळी सांगलीत जे घडले तेच सांगोल्यात घडण्याची शक्यता दिसत आहे. लोकसभा निवडणुकीवेळी सांगली मतदारसंघ परंपरागतरित्या कॉंग्रेसचा बालेकिल्ला असतानाही जागा वाटपात हा मतदारसंघ शिवेसेनेकडे (ठाकरे) गेल्याने त्या निवडणुकीतही शिवसेना आणि कॉंग्रेसचा बंडखोर उमेदवार रिंगणात दाखल झाले होते. अखेरीस या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव होत बंडखोर विजयी झाले. आघाडीअंतर्गत याच संघर्षाचा नवा अंक आता सांगोल्यात दिसण्याची शक्यता आहे.