महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा अद्याप निर्णय झालेला नाही. मात्र, सांगलीसह मिरज, खानापूर विधानसभा मतदारसंघ शिवसेनेनेच लढवावा. त्याठिकाणी निष्ठावान उमेदवारास संधी द्यावी, अशी अग्रही मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी केली.
माधवनगर येथील शासकीय विश्रामगृहात आढावा बैठक झाली. यावेळी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मागणी केली. विधानसभानिहाय आढावा घेऊन वरिष्ठांकडे अहवाल सादर केला जाईल, असे जिल्हाप्रमुख संजय विभूते यांनी जाहीर केले. यावेळी आठही विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला. संघटनात्मक बांधणी सक्षम करण्याचा निर्धार यावेळी करत त्यानुसार रिक्त पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती करण्यात आली.
तासगाव, कवठेमहांकाळ उपजिल्हाप्रमुखपदी संजय चव्हाण, विधानसभा प्रमुखपदी अनिल पाटील, उपतालुका प्रमुखपदी अनिल शिंदे तसेच मिरज शहरप्रमुखपदी महादेव हुलवान यांची नियुक्ती करण्यात आली. महिला आघाडी आणि युवासेना यांनी त्यांच्यास्तरावर येत्या आठ दिवसांत तालुकानिहाय बैठका घेऊन संघटनात्मक मेळावे घेण्याच्या सूचना जिल्हाप्रमुख विभूते यांनी दिल्या.
खानापूर, मिरज आणि सांगली विधानसभा कोणत्याही परिस्थितीमध्ये शिवसेनेने सोडू नये, असा आग्रह सर्व पदाधिकाऱ्यांनी केला. यावर इच्छुक उमेदवारांची सर्वांनी मिळून एकमत करून पक्षातील एकनिष्ठ कार्यकर्त्याला उमेदवारी द्यावी, असा प्रस्तावही यावेळी मांडण्यात आला. विधानसभानिहाय बैठका घेऊन एका उमेदवारावर एकमत करून त्याचा अहवाल शिवसेना उपनेते नितीन बानगुडे पाटील व शिवसेना नेते भास्कर जाधव यांच्याकडे दिला जाईल, असे विभूते यांनी सांगितले.