लेंगरेतील पीर कलंदर बाबा उरुसास आज प्रारंभ!

प्रतिवर्षीप्रमाणे यंदा लेंगरे (ता. खानापूर) येथे कलंदर बाबांच्या उरुसास आज सोमवार, दि. १५ रोजी प्रारंभ होत आहे. यानिमित्ताने रात्री ९ वाजता चावडीसमोर मानाचा तमाशा पारंपरिक पद्धतीने होणार आहे, तर मंगळवार, दि. १६ एप्रिलला पहाटे साडेतीन वाजता कलंदर बाबांच्या संदल शरीफ मानाचा गलेफ व मानाच्या गाड्याची सवाद्य मिरवणूक प्रमुख मानकऱ्यांच्या उपस्थितीत होईल.

संदल व गलेफचा मान मच्छिंद्र जालिंदर शिंदे पाटील व हशमुद्दीन बहुरुद्दिन पिरजादे यांना आहे.
सकाळी गोड नैवेद्य अर्पण केला जाणार आहे. दुपारी तीन वाजता यात्रा कमिटीच्या मानकऱ्यांच्या उपस्थितीत बैलाच्या गाड्यांची सवाद्य मिरवणूक निघणार आहे. यात प्रामुख्याने ढोल- ताशा, हलगी पथक, वाजंत्री यांच्यासह सर्व भाविक सहभागी होत असतात.रात्री आठ वाजता वैभव आर्केस्ट्रा कोल्हापूर यांचा मनोरंजनाचा कार्यक्रम यांत्रा कमिटीच्या वतीने आयोजित केला आहे.

दर्गा ट्रस्ट व लेंगरे ग्रामस्थांच्या वतीने कव्वाल आतिश मुराद यांचा कार्यक्रम रात्री ७ वाजता आयोजित करण्यात आला आहे.
यात्रा कमिटीचे अध्यक्ष मधुकर पाटील, सदस्य मच्छिंद्र शिंदे-पाटील, सुदाम शिंदे, अमृतराव नाईक- निंबाळकर, अशोक भादुले यांनी यात्रेचे नियोजन केले आहे. यात्रेनिमित्त आयोजित सर्व कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.