राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष,माजी मंत्री आमदार जयंत पाटील गुरुवारी २४ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. रॅली काढून अर्ज दाखल केला जाणार आहे. तब्बल १ लाखांच्या मताधिक्याने जयंत पाटील यांना विजयी करणार असल्याचा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत बाेलून दाखविला.
गुरुवारी सकाळी १० वाजता वाळवा पंचायत समितीपासून रॅली शहराच्या मुख्य मार्गावरून गांधी चौकात येईल. येथे रॅलीचे सभेत रूपांतर केले जाईल. यानंतर आमदार पाटील उमेदवारी अर्ज दाखल करतील. या दिवशी इस्लामपूर, आष्टा शहरासह वाळवा तालुका व मिरज तालुक्यातील ८ गावातील कार्यकर्ते व नागरिक उपस्थित राहतील, असे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विजय पाटील यांनी सांगितले. आघाडीतील मित्र पक्षांसह आम्ही एकदिलाने ही निवडणूक लढवू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.