आणखी एक ‘बॉर्डर’ लव्‍ह स्‍टोर! पाकिस्‍तानी महिला भारतात दाखल

गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानमधून (Pakistan) भारतात आलेल्या सीमा हैदरची सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे.  पाकिस्तानची सीमा आणि भारतामधला सचिन यांच्या लव्ह स्टोरीनं जगभरातील लोकांचे लक्ष वेधले होते. सीमा आणि सचिन यांच्या कथेवर आधारित एक चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता सीमाप्रमाणेच जवेरिया खानम ही पाकिस्तानमधील तरुणी भारतात आली आहे. ती तरुणी भारतातील एका तरुणासोबत लग्न करण्यासाठी भारतात आली आहे. कोण आहे जवेरिया खानम? याबद्दल जाणून घेऊयात…

जवेरिया खानम ही कराची येथील रहिवासी अजमत इस्माईल खान यांची मुलगी आहे. ती भारतातील कलकत्ता येथे राहणाऱ्या समीर खानसोबत गेल्या 5 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होती. जवेरियाला भारतीय गाण्यांची खूप आवड आहे, तिने गायलेले मोह-मोह के धागे हे गाणे सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. जवेरिया ही 45 दिवसांच्या व्हिसावर भारतात आली आहे. 

माध्यमांसोबत बोलताना समीर खानने सांगितले की, जवेरिया आणि त्याची प्रेमकहाणी  2018 मध्ये सुरू झाली. तो म्हणाला, “मी 2018 मध्ये जर्मनीहून घरी आलो होतो. तेव्हा  मी माझ्या आईच्या मोबाईलमध्ये जावेरियाचा फोटो पाहिला. ती मला आवडली. तेव्हा मी माझ्या आईला सांगितले की, मला जवेरियाशी लग्न करायचे आहे. हे ऐकून माझ्या आईला आनंद झाला.”

जवेरिया ही मंगळवारी (5 डिसेंबर 2023) अटारी सीमेवरून भारतात आली, जिथे जवेरियाचा होणारा पती समीर खान आणि तिचे होणारे सासरे अहमद कमाल खान युसूफझाई हे तिच्या स्वागतासाठी उपस्थित होते. अटारी सीमेवर ढोल वाजवून जवेरियाचं स्वागत केलं. तसेच जवेरियाला  फुलांचा गुच्छ देखील देण्यात आला.

भारतात आल्यानंतर जवेरिया खानमने  पत्रकारांशी संवाद साधला. तेव्हा तिने सांगितले की,”दोन्ही कुटुंबांच्या संमतीने मी आणि समीर जानेवारी 2024 च्या पहिल्या आठवड्यात भारतात एकमेकांशी लग्न करणार आहोत.”