Israel-Iran युद्धाने भारतात वाढणार महागाई……

Israel-Iran यांच्यामध्ये युद्ध होणार हे भाकित अखेर खरे ठरले. जगाच्या पटलावर तिसऱ्या युद्धाने बिगुल वाजवला. रशिया-युक्रेन युद्ध दोन वर्षांहून अधिक काळापसून सुरु आहे. तर हमास-इस्त्राईल संघर्ष सुरु आहे. त्यात आता इराणने पण उडी घेतली. इराणने 14 एप्रिल रोजी इस्त्राईलवर 300 क्षेपणास्त्र डागले होते. त्याचा बदला आज इस्त्राईलने घेतला. पण यामुळे जगात चिंतेचे वातावरण पसरले आहे. युरोप आणि अमेरिकेला या युद्धाच्या झळ कितपत बसतील हा संशोधनाचा विषय आहे. पण भारतीय व्यापारावर त्याचा मोठा परिणाम होणार हे नक्की.

  1. इराण-इस्त्राईल युद्धाचा सर्वात मोठा फटका कच्चा तेलाला बसण्याची शक्यता आहे. भारत सध्या कच्चा तेलासाठी रशियाच्या अगदी जवळ गेला आहे. तर इतर देशांकडून सुद्धा कच्चा तेलाची आयात सुरु आहे. इराणकडून तेलाची आयात गेल्या पाच वर्षांत खूप कमी झाली आहे. कच्चा तेल महागण्यासाठी हे युद्ध कारणभूत असेल असे बिझनेस टुडेच्या वृत्तात अंदाज वर्तविण्यात आला आहे.
  2. ब्रेंट क्रूड ऑईलच्या किंमतीत या चार महिन्यांतच मोठी दरवाढ झाल्याचे वृत्तात नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार, 19 टक्क्यांनी कच्चा तेलाच्या किंमती वधारल्या आहेत. 12 एप्रिल 2024 रोजी किंमती 90.45 डॉलर प्रति बॅरल होत्या. तर 2 जानेवारी 2024 रोजी या किंमती 75.89 डॉलर प्रति बॅरल होत्या. युद्धाचा भडका उडाल्यास तेलाच्या आयतीवर त्याचा परिणाम होऊन इंधनाचे आतंरराष्ट्रीय बाजारातील भाव वाढू शकतील.
  3. चीन सध्या इराणकडून 15 टक्के सवलतीत कच्चा तेलाची आयात करत आहे. इराणचे हितसंबंध जपण्यासाठी चीन इराणला मदत करण्याची चिन्हे आहेत. इराण हुथी (Houthi) दहशतवाद्यांना खतपाणी घालत आहे. त्यांनी भारतीय जहाजांना पण मध्यंतरी लक्ष केले आहे. त्याचा एकूणच परिणाम व्यापारावर झालेला आहे.

डिझेलचे दर वाढल्यास अन्नधान्यासह इतर वस्तूंच्या किंमती वाढू शकतात. देशात महागाईने अगोदरच डोकेवर काढले आहे. केंद्र सरकारच्या महागाई कमी करण्याच्या प्रयत्नांना मोठा झटका यामुळे बसू शकतो.