Maharashtra Politics: सांगोल्याच्या कारमधून ५ कोटी जप्त! राऊतांच्या आरोपावर शहाजी पाटलांची प्रतिक्रिया, म्हणाले…..

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील खेड-शिवापूर टोलनाक्यावर एका वाहनांमध्ये पाच कोटी रुपयांची रोकड आढळून आली आहे. ही रक्कम सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांचे असल्याचे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं होतं.यावर आमदार शहाजी बापू पाटील यांनी सम टीव्हीला आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर गंभीर आरोप केला आहे. शहाजी बापू यांनी सांगितले की, ‘राज्यातील ठाकरे सरकार कोसळल्यापासून संजय राऊत यांना शहाजी बापू पाटीलच दिसत आहेत.

या गाडीशी , यामध्ये सापडलेल्या पैशांशी किंवा त्या कार्यकर्त्यांशी माझा काहीही संबंध नाही.’, असा खुलासा शहाजी बापू पाटील यांनी केला आहे. तसंच, ‘सांगोला मतदारसंघात महाविकास आघाडीमध्ये फूट पडल्याने माझ्याविरुद्ध राजकीय षडयंत्र रचले जात आहे.’, असा आरोप देखील शहाजी पाटील यांनी केला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात आचारसंहिता असताना पुण्यात ५ कोटी रुपयांची रोख रक्कम घेऊन जाणारी कार पोलिसांनी पकडली. ही कार मोठ्या नेत्याचा असल्याचा आरोप केला जातोय. पुणे-बंगळुरु महामार्गावरील खेड-शिवापूर टोल नाक्यावर राजगड पोलिसांनी रात्री उशिरा ही कारवाई करत कारमधील पैसे आणि कार पोलिसांनी जप्त केली. या घटनेमुळे राज्यामध्ये खळबळ उडाली आहे.