विधानसभा निवडणुकीसाठी शेकापच्या तिकिटासाठी चुलतबंधूमध्ये होणार रस्सीखेच

स्वर्गीय आबासाहेबांनी (गणपतराव देशमुख) दिलेली जबाबदारी मी पूर्ण करणार आहे. आबासाहेबांनी सांगोला तालुक्यासाठी जे स्वप्न पाहिले होते ते पूर्णत्वाकडे घेवून जाण्यासाठी मी प्रयत्नशील आहे.स्व. आबासाहेबांच्या स्वप्नपूर्तीसाठी मी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकच असल्याचे मत शेतकरी कामगार पक्षाचे डॉ. अनिकेत देशमुख यांनी व्यक्त केले.

लोकसभा निवडणूक संपताच विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. सांगोला तालुक्यात विधानसभेसाठी महायुती व महाविकास आघाडीकडून नेते मंडळी प्रयत्नांची शिकस्त करताना दिसून येत आहेत. शेतकरी कामगार पक्ष हा सध्या महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहे. या पक्षामध्ये डॉ. बाबासाहेब देशमुख व डॉ. अनिकेत देशमुख या चुलतबंधूमध्ये शेकापच्या तिकिटासाठी रस्सीखेच असणार आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात आपली भूमिका मांडताना डॉ. अनिकेत देशमुख म्हणाले की, लोकशाहीमध्ये सर्वांनाच आपला हक्क बजाविता येतो. मी लोकशाहीला मानणारा आहे. आबासाहेबांनी (गणपतराव देशमुख) मला गेल्या वेळेला विधानसभेच्या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव शिक्षण अर्धवट सोडून निवडणूक लढवण्यास सांगितले होते.

जनतेच्या आग्रहस्तव आबासाहेबांनी दिलेली जबाबदारी मी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. या निवडणुकीपासून मी सांगोला तालुक्यातील सर्वच सामाजिक, राजकीय व शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यक्रमात सहभागी आहे.
सामाजिक कामासाठी, पक्षाच्या कामासाठी मी आजही प्रामाणिकपणे प्रयत्न करीत आहे व यापुढेही करीत राहणार आहे. गेल्या वेळी विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी आबासाहेबांनी सांगितले होते. यावेळी त्यांचे आमदारकीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी विधानसभा निवडणूक लढविणारच आहे.