विठ्ठल-बिरोबाच्या नावानं चांगभलंच्या जयघोषात, ढोल-कैताळांच्या निनादात, भंडाऱ्याच्या अखंड उधळणीत मोठ्या भक्तिमय वातावरणात हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली येथील प्रसिद्ध श्री विठ्ठल बिरदेवाच्या यात्रेस आज प्रारंभ झाला.
सकाळी प्रथेपरंपरेनुसार विधिवत कार्यक्रमांना सुरुवात झाली. मानाच्या दुधारी तलवारींचे गावचावडीत पूजन झाले. या तलवारींचे मिरवणुकीने भानस मंदिर व श्रींच्या मंदिरात पूजन करून फरांडेबाबांकडे मार्गस्थ करण्यात आल्या. प्रकाश पाटील, रणजित पाटील, जोशी, आवटे, गावडे, कुलकर्णी, चौगुले, आदी मानकरी व धनगर समाज पंच मंडळींनी फरांडेबाबांना भेटून मंदिरात येण्याचे निमंत्रण दिले.
हे निमंत्रण स्वीकारून फरांडेबाबा मानाच्या दगडी गादीवरून उठले. फरांडेबाबांनी हेडाम नृत्य केले. यावेळी जमलेल्या लाखो भाविकांनी बाबांच्या अंगावर भंडारा, खारिक-खोबरे, बाळ लोकर यांची मुक्त हस्ते उधळण केली. फरांडेबाबा यांनी मंदिरात जाऊन श्रींचे दर्शन घेतले व तिथे देववाणी (भाकणूक) केली. यात्रेतील मुख्य कार्यक्रम झाला असला तरी यात्रेतील धार्मिक विधी अजून दोन दिवस चालणार आहेत.
फरांडेबाबांची भाकणूक
पर्जन्य- नऊ दिवसांत पावसाचे कावड फिरेल, पाऊसकाळ चांगला राहील
धारण-चढती राहील, महागाई वाढेल
राजकारण – राजकारणात उलथापालथ होऊन भगवा फडकेल
भूमाता – भारताचे समान नागरी कायद्याच्या दिशेने वाटचाल
बळीराजा – रोहिनीचा पाऊस, मृगाचा पेरा होईल
महासत्ता – भारताची महासत्तेकडे वाटचाल
हितसंबंध – बहीण-भावाच्या नात्यातला सलोखा कमी हाईल
रोगराई – देवाची सेवा करील, त्याची रोगराई दूर हाईल
काबंळा – मी स्वतः मेढंका होऊन हातात वेताची काठी घेऊन सेवा करणाऱ्या भक्ताचे सदैव संरक्षण करीन