भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आम. सुरेश हाळवणकर यांचे सख्खे मित्र व भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष, यंत्रमाग महामंडळाचे माजी अध्यक्ष हिंदुराव तुकाराम शेळके यांनी भारतीय जनता पार्टीच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे यांच्याकडे शुक्रवारी राहू काळ संपल्यानंतर पाठविला आहे. भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष यंत्रमाग महामंडळाचे माजी अध्यक्ष हिंदुराव शेळके यांनी भारतीय जनता पार्टी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा भारतीय जनता पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष ग्रामीण राजवर्धन नाईक निंबाळकर यांच्याकडे सुपूर्द केला. इचलकरंजी विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या निष्ठावंत कार्यकर्त्याला पक्षाने डावल्याने नाराज होत हिंदुराव शेळके यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यांनी उमेदवारी अर्जही आणला आहे.
२८ ऑक्टोबर रोजी ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. हिंदुराव शेळके हे गेले अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीचे काम करत होते. त्यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या निवडणुकीत दोन वेळा सुरेश हाळवणकर आमदार म्हणून निवडून आले होते. इचलकरंजी विधानसभेत भाजपाची ताकद असताना पक्षाने डावलल्याने ते गेले काही दिवस नाराज होते. आज पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने ते निवडणूक लढवणार हे निश्चित झाले आहे.