इचलकरंजीत महाविकास आघाडीला धक्का! ‘हा’ गट राष्ट्रवादीचे घड्याळ हातात बांधण्याच्या तयारीत

इचलकरंजी शहरातील राजकीय समीकरणे वेगवेगळी असली तरी पक्षांतर्गत विस्तार अधिक झालेला आहे. त्यासोबतच गटातटाचे राजकारण इथे महत्त्वाचे मानले जात आहे. विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडी इचलकरंजी महानगरपालिका निवडणूक एकत्रपणे लढत अशी बैठक झाली. पण महिनाभरातच इचलकरंजीच्या राजकारणाला वेगळी कलाटणी मिळाली आहे. महाविकास आघाडीमध्ये असणारा चाळके गट राष्ट्रवादीचे घड्याळ हातात बांधण्याच्या तयारीत आहे. इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मँचेस्टर आघाडी नव्या राजकीय समीकरणाबाबत सुत जुळवण्याच्या तयारीत आहे.

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन त्यांनी सकारात्मक चर्चा केल्याची माहिती आहे. येत्या काही दिवसात यांचा पक्षप्रवेश होणार असून इचलकरंजी मधील दोन मातब्बर नेते देखील महायुतीच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे. इतर पक्षासोबत माजी नगरसेवक चाळके यांचा राजकीय गट देखील इचलकरंजीच्या राजकारणात महत्त्वाचा मानला जातो. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत माजी आमदार प्रकाश आवाडे यांचा तर या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार मदन कारंडे यांचा या गटाने प्रचार केला होता.

तर महापालिकेच्या राजकारणात ताराराणी आघाडी सोबत असणारा हा गट आता मँचेस्टर आघाडी म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या आघाडीला नवीन वाट शोधून बळ देण्याचा प्रयत्न माजी नगरसेवक चाळके यांचा आहे. कोल्हापूर जिल्हा बँक येथे जाऊन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन पक्षप्रवेशाबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.