आवाडे-हळवणकरांच्या मनोमिलनाने भाजप सुसाट! मात्र….

इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात आमदार प्रकाश आवाडे आणि राहुल आवाडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर माजी आमदार सुरेश हळवणकर यांच्या उमेदवारीचा पेच निर्माण झाला होता. मात्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी इचलकरंजी घाटात या दोघांच्यातील हिरवा झेंडा दाखवला. माजी आमदार हळवणकर आणि आवाडे पिता-पुत्रा यांच्यात मनोमिलन झाले असले, तरी कार्यकर्त्यांचे मनोमिलन करण्यासाठी हळवणकर आणि आवाडे यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. शिवाय महायुतीमधील भाजपचे जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष विठ्ठल चोपडे आणि शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र माने यांची भूमिका महत्त्वाची आहे. शेळके यांनी आतापासूनच बंडाची निशाण फडकवले आहे. विधानसभा निवडणुकीत सध्या महायुतीकडून भाजपतर्फे राहुल आवाडे, तर महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे मदन कारंडे यांची उमेदवारी निश्‍चित समजली जात आहे.

तर भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके यांनी नुकतीच सांगली येथे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारीची घोषणा केली आहे. आपल्यासमोर सर्व पक्षाचे पर्याय खुले असल्याचं त्यांनी सांगत महायुतीच्या उमेदवाराला एक प्रकारे इशाराच दिला आहे.महायुतीतील शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून जिल्हाप्रमुख रवींद्र माने इच्छुक आहेत. परिणामी, त्यांची बंडखोरी महायुतीसाठी मोठे डोकेदुखी ठरू शकते.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महानगर जिल्हाध्यक्ष विठ्ठल चोपडे यांनीही निवडणुकीची तयारी सुरू ठेवली आहे. यांच्यावरच महायुतीचे गणित अवलंबून आहे. शिवाय इचलकरंजीमधील छोट्या मोठ्या आघाड्या आणि पक्षांना मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. मॅचेस्टर आघाडी नेमकी काय भूमिका घेणार हे देखील पाहणे महत्त्वाचे आहे.